Friday, February 1, 2019

तुम्ही कवी आहात ??

तुम्ही कवी आहात !!! तुम्ही मुक्तछंदात लिहिता !!! मला तर फार आवडतात मुक्तछंद ..... बरं तुम्हाला वृत्तबद्ध कविता नावाचा प्रकार आपल्या साहित्यात आहे हे माहितीय का???? नसेल तर माहीत करून घ्याल का??? वृत्तबद्ध लिखाण शिकू नका हो ..... मात्रा बित्रा मोजू नका .... फक्त माहिती असू द्या की असाही एक प्रकार साहित्यात आहे...

हे वर लिहिलेले स्वगत आहे पण हे मनात येण्यामागची कारणेही तशीच आहेत. अगदी सुरुवातीलाच मुक्तछंदातली कविता मुलांच्या अंगात पेरली गेली , मुरवली गेली किंवा रुजवली गेली , त्याच वेळी वृत्तबद्ध कविता प्रकार किमान कानावर टाकायला हवा होता किंबहुना टाकायला हवा असे मला वाटते. पुढे ज्याची त्याची आवड आहे आणि आवडीनुसार क्षेत्र निवडले जाईलच ही नैसर्गिकता आहे. आज एखादा कवी जेव्हा भूत पाहिल्यासारखा वृत्तबद्ध कवितेला बघतो तेव्हा वाईट वाटण्याऐवजी त्याची कीव वाटते. हा प्रकार इथपर्यंत गेलाय की वृत्तबद्ध कविता म्हणजे आजकालच्या काही लोकांनी साहित्यिक काड्या करून काहीतरी वेगळे शोधून आणले असावे आणि त्याला काही एवढे मनावर घ्यायचे नसते असे काही कवींच्या हावभावातून जाणवते.

कुण्या एका प्रकाराची बाजू घेऊन दुसऱ्याला कमी लेखणे हा माझा उद्देश नाहीय. माझे म्हणणे आहे की तुम्ही किमान दखल तर घ्या ... वृत्तबद्ध कविता अथवा गजल आशयाला परिपूर्ण न्याय देऊ शकते आणि मुक्तछंदात जे मांडायचे तेही शिस्तीत मांडू शकतात... मंचावर मोठमोठ्याने ओरडून, छाती बडवून सादर केलेल्या आणि टाळ्या मिळवणाऱ्या रचना खरोखर कविता आहेत का??? कुणी यावर चर्चा करायला तयार आहे का? मुळात त्याचा शोध कुणाला घ्यायचा नाहीय... नाटक, कविता, गीत या प्रकारात भिन्नता आहे ना .... मग आपण जे मुक्तछंद म्हणून सादर केले ते एकपात्री नाटक तर नव्हते???? बहुतांश कविता तशाच जाणवतात आजकाल..... चार मोठी पाने भरतील एवढ्या लांबीची ही कविता सादर करताना तो कवी मांडी थोपटतो , हातवारे करतो ,अभिनय करतो तेव्हा तो नाटक सादर करत असतो आणि आपण त्याला कविता समजून दाद देत राहतो... मुक्तछंद म्हणजे गंम्मत वाटते लोकांना ... स्वतःशी झालेला संवाद असा मंचावर आरडाओरड करून सादर करायचा असतो का??? अर्थात सादरीकरण हा मोठा विषय आहे ...पण त्यावर आपण नंतर कधी चर्चा करू ... सादरीकरण आणि अभिनय हे वेगवेगळे पैलू आहेत हे मात्र जाणून घ्यावे ...

मला मुक्तछंद लिहिता येतो किंवा छान लिहिता येतो असा माझा गैरसमज अजिबात नाहीय. मात्र मला तो खूप चांगल्या रीतीने ओळखता येतो आणि जगताही येतो यावर मी ठाम आहे. वर्णनात्मक कविता मुक्तछंदातून मांडणे म्हणजे केवढी मोठी मस्करी आहे मुक्तछंदाची आणि केवढा मोठा अपमान आहे गद्याचा !!! मुक्तछंदाला विषयांचे बंधन असायला नसले तरी कोणते विषय वर्ज्य आहेत हेही लिहित्या हातांनी ओळखायला हवे....

रानातल्या झाडांना
हिरवी हिरवी पाने आलेली आहेत
आणि फांद्यांवर काही फळेसुदधा
लागलेली दिसत आहेत
त्याच झाडावर काही पक्षांनी
घरटी बांधलेली आहेत....

हिला कविता म्हणायचे का? मग गद्य काय आहे? ... आता बघा ! संवादातून जन्म घेणारी कविता आहे तर तिचा आशय सुद्धा तसाच असावा की नाही? ..... काही व्यक्तींचा आपसात चाललेला संवाद या कवितेत कसा घेऊ शकतो आपण??

ती म्हणाली" मी बाजारात चालले"
मग मी म्हणालो "कशाला"
ती पुटपुटली "भाजी आणायला"
मग ते म्हणाले "आम्हीही येऊ का"
शेवटी ती म्हणाली "नाही मीच जाऊन येते"

असे गद्याचे तुकडे केल्याने कविता बनते का कधी?.... काही लोक तर याला सुद्धा चाल लावून सादर करतात !!! चाल लावून सादर करणारा वर्ग आजकाल वाढलाय हे वेगळे सांगायला नकोय... याला प्रशंसेचा हव्यास कारणीभूत आहे .काही कवी गातातही छान, त्यांच्या कविता असतातही सुंदर मान्य आहे . माझे अनेक जवळचे मित्र- मैत्रिणी तसेच वलयातले अनेक लोक उत्तम गातात आणि लिहितात सुदधा...ही ईश्वरदत्त देणगी आहे यावर माझा विश्वास आहे ...पण म्हणून सर्वांनीच गायला हवे का? आणि वरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य याविषयावर बोलायला तयार असतात लोक.. ओघात विषय आला म्हणून तरन्नुम वर घसरलो .... मुद्दा तो नाहीच आहे आपला….

मुळात कवितेवर होत असलेले कुसंस्कार टाळले गेले पाहिजेत आणि हे प्रकार सर्व साहित्यिकांनी मिळून करायला हवेत. एकीकडे व्हाट्स अप वर कवितासदृश अनेक पदार्थ हिंडत असतात जे कविता प्रकारात मुळीच मोडत नाही तरीही कवितेची ओळख नसलेले लोक कविता समजून त्यांच्या समूहात आनंदाने शेअर करतात ... आणि मग ते लोक वाहवा करत सुटतात.... इथून पुढे एक पिढी त्या पदार्थालाच कविता समजत राहते ही बाब फार गंभीर आहे.... सर्वगुणसंपन्न वृत्तबद्ध कविता, गजल , मुक्तछंद अथवा कोणतीही कलाकृती कशी असते हे वाचकांना समजावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे ... व्हायरल झालेल्या अनेक कविता(?) एकदम भंकस असतात तरीही लोक वरती केप्शन टाकतात .... "माझ्या वाचनात आलेली आजवरची सर्वात सुंदर कविता" ....असे कसे म्हणू शकतात राव !!! आयुष्यात जर तुम्ही मोजून 2 4 कविता वाचल्या असतील आणि त्यात ही अर्थहीन कविता तुम्हाला आवडली असेल तर काय करणार ?? आजूबाजूच्या किमान शंभर लोकांच्या मनावर ही कुसंस्कारीत कविता स्वार होऊन बसणार.

जेव्हा शालेय अभ्यासक्रमात कविता पाठ करणे शिकवले जाते त्याचवेळी मुलांना सर्व काव्यप्रकार शिक्षकांनी शिकवायला हवेत. वृत्तबद्ध/ गेय कविता का जन्माला आली किंवा तिचे फायदे काय हेही सांगायला हवे. पुढे जाऊन मुक्तछंद कविता कशी उदयास आली आणि तिच्या लेखनातून आपल्याला कसे समृद्ध होता येते हेही शिकवले पाहिजे. यासाठी स्पेशल आठ तास शिकवले पाहिजे असेही काही नाहीय. अर्धा तासात समजावले तरी मुलांना फरक तरी कळेल आणि प्रकार तरी माहिती होतील. शिक्षकांना याचे महत्व माहिती असावे. व्याकरण, बोली भाषा, कविता, मांडणी यावर काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक मेहनत घेताना दिसतात हे खरे असले तरी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी सोयीस्कर रीतीने वगळल्या जातात. पोट भरण्यापूरते शास्त्रीय/ गणितीय शिक्षण देताना कलेला अव्हेरले जातेय याकडे कुणाचे लक्ष नाहीय. कोणतीही कला खरेतर गणित अथवा शास्त्रांचा पाया आहे हे का समजावले जात नाही विद्यार्थ्यांना ? वर्षाभरात फक्त मराठी दिनानिमित्त मराठी कवितेला शाळा-कॉलेजमध्ये पाहुणी म्हणून बोलवाल आणि इतर दिवस तिला टाळाल तर तिचा आणि मुलांचा विकास कसा होणार? कविता ही आर्थिक उत्पन्नाचे साधन नसले तरी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या सर्व साधनांचे मूळ आहे . कारण कविता ही आत्मिक ऊर्जा आहे म्हणून ती सुसंस्कारित असणे फार गरजेचे आहे.

जे सुजाण पालक मुलांना वाचनाची गोडी लावतात आणि ज्यांना साहित्यात खरेच स्वारस्य आहे त्यांनीही त्यांच्या मुलांना कविता आणि अकविता यातला फरक सांगायला हवाय. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे चांगल्या कविता दडून राहतील आणि कविता नसलेल्या गोष्टी पुढे जातील अशी शक्यता नाकारता येत नाही. आजकाल तथाकथित आश्रमातून/ मठातून काव्यावर रोज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. फाफडयाच्या आकाराची कविता, जिलेबीच्या आकाराची कविता, खमण ढोकळा, असेंडिंग कविता , डिसेंडिंग कविता , सुप्रभातीय कविता !!!! वाट लावलीय राव लोकांनी .... शून्य भांडवलात सुरू करायचा व्यवसाय आहे जणू !!! त्यात पुन्हा यांच्या स्पर्धा होतात आणि हे प्रमाणपत्र सुद्धा देतात विजेत्यांना ..... कमाल आहे की नाही ? एकतर फाफडीय कविता तुम्ही उदयास आणून इतर सर्व प्रकारांचा अपमान करत आहात त्यात वरून त्यांना पुरस्कार देत आहात म्हणजे ही बंडखोरी झाली.

मी वृत्तबद्ध कविता, गजल यांच्यावर नितांत प्रेम करतो पण तेवढेच प्रेम मुक्तछंदावरसुदधा करतो हे पुन्हा एकदा नमूद करावे वाटतेय. माझ्या मित्रयादीत असेही मित्र आहेत जे उत्तम मुक्तछंद लिहितात आणि सोबत वृत्तांची माहिती करून घेतात. वेळ आल्यास त्यावर चर्चाही करतात. सर्वाना सर्वच प्रकार एकाच वेळी,सारख्याच ताकदीने हाताळता येतील असेही काही नाही त्यामुळे ती अपेक्षा करणे चुकीचे आहे. माझे म्हणणे केवळ इतकेच आहे की साहित्यात असलेल्या इतर प्रकारांची तुम्ही माहिती ठेवा आणि तिचा प्रसार सुद्धा करा ,जेणेकरून लोक अंधारात राहणार नाहीत आणि चुकीच्या मार्गाला सुद्धा जाणार नाहीत. प्रत्येकाची वृत्ती, अभिरुची त्याला योग्य त्या वेळी साक्षात्कार देईलच. वाईट गोष्टींना वाईट वाईट म्हणणे गरजेचे आहे. दर्जेदार लिखाण वाचकापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि निकृष्ट लेखन जागीच थोपवले पाहिजे. गुणवत्ता आधारित निकष कवितेला लागायला हवेत नाहीतर येत्या काळात साहित्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि त्याचे परिणाम पुढच्या सर्व पिढ्याना भोगावे लागतील . बस इतकंच ....

-- संतोष

Saturday, September 8, 2018

खरी लढाई नंतर आहे


शिक्षण शाळा पुर्वतयारी जरी वाटते खडतर आहे
मुलामुलींनो आयुष्याची.. खरी लढाई नंतर आहे....

अभ्यासाला लवकर उठणे.. तुम्हा वाटते शिक्षा आता
करमणुकीवर बंधन आले म्हणून का संतापुून जाता
जरी वाटतो सपाट रस्ता मित्रांनो हा डोंगर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे...

पप्पा मम्मी ओरडले तर चिडू नका वा नका ओरडू
आजारावर रामबाण औषध खात्रीने असणार कडू
भविष्य तुमचे जीवन तुमचे...चिडणे प्रेमाखातर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे....

कमी वयातिल प्रेम असो वा आकर्षण वा तसेच काही
त्यांच्यावरती निर्णय घेण्या नको कधीही कसली घाई
मैत्री टिकते...प्रेम वगैरे सारेकाही वरवर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे...

घटक चाचण्या पुर्व परिक्षा किंवा असेल मुख्य परिक्षा
जीवन घेते  संस्कारांची क्षणाक्षणाला नकळत दिक्षा
बागडण्याला अभ्यासाची सदैव साथ खरोखर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे....

-- संतोष

Tuesday, August 21, 2018

मुक्तछंद


कमालीचे ढेपाळलेपण एकंदर मराठी कवितेत दिसून येतेय. हेकेखोरपणा आणि स्पर्धा या दोन ज्वालामुखींच्या तोंडातून दिवसेगणिक वाहत चाललेला कविता नावाचा लाव्हारस एक दिवस नक्कीच खडकासारखा कडक ,निर्जीव होईल आणि मातीत धसून जाईल हे निश्चित... एक चमू असा आहे जो म्हणतोय की कविता जशी सुचली लिहू... तिच्यावर संस्कार करणार नाही. दुसरा चमू म्हणतो आधी संस्कार शिकून घ्या मग येणारी कविता आपोआप तो रंग घेऊन येईल. तिसरा चमू म्हणतो या दोन्ही चमूंना लिखाणाचे ज्ञान नाही. एखादा सरळ सरळ सुरेश भटांच्या अनमोल लिखाणावर टिका करुन जातो. कुणी म्हणतो ग्रेसांच्या कविता म्हणजे दुर्बोध असतात, मंगेश पाडगावकर फार सामान्य लिखाण करायचे आणि एखादा म्हणतो ढसाळांची कविता वाचावीशी वाटत नाही. हा प्रकार आहे तरी नेमका काय?? आपण आपल्या बाळबोध बुद्धीनुसार इतर लोकांचे मुल्यमापन करणार आहोत का? मूल्यमापन करण्याची आपली फूटपट्टी callibration केलेली आहे का? इतर कुणाच्या साहित्यावर बोट ठेवण्यापुर्वी आपल्या स्वतःच्या लिखाणाचे,ज्ञानाचे किवा वाचनाचे मुल्यमापन आपण करुन घ्यायला नको का?

बोटावर मोजणारे समिक्षक उरलेत आता आपल्या हातात. त्यांनाही मनसोक्त लिहिण्याची मुभा कदाचित राहिली नसावी. साहित्याचे मुल्यमापन करताना त्याचे रसग्रहण करता आले पाहिजे. कविता वाचली /आवडली मान्य पण नेमके काय आवडले आणि कविता वाचली /नाही आवडली तर नेमके काय नाही आवडले या दोन्ही गोष्टींचे सकारण उत्तर रसग्रहणासोबत देऊ शकतोय का आपण?? काम असते,जबाबदार्‍या असतात , वेळ मिळत नाही म्हणून साहित्यावर सकस अभिप्राय लिहिणे जमणार नाही असे आपण मोठ्या दिमाखात सांगतो आणि याउलट याच घाईत याच धावपळीत एखादी रचना वाचून पटकन तिच्यावर ताशेरे ओढून जातो आपण. उत्तम साहित्याला सविस्तर उत्तम म्हणायला आपल्याला कमीपणा वाटतो आणि उत्तम(?) नसलेल्या साहित्याला अगदी तज्ञ असल्यासारखे कसे उत्तम नाही हे पटवून देतो.

आपल्या अंतर्मनातील विचारांच्या समुद्रात चांगल्या वाईट विचारांच्या लाटा नेहमी उसळत असतात. या लाटांचा वेग काही काळ तरी सारखा असतो.  ही घटना सतत तीव्रतेने घडत असल्याने आपण हीला विचारांची वारंवारीता म्हणू या. ही वारंवारीता एखाद्या कल्पनेबद्द्ल,स्वप्नाबद्दल,घटनेबद्द्ल जेव्हा एका नियमित गतीने व्यक्त होऊ लागते तेव्हा गद्याचे तुकडे पडू लागतात. जे व्याकरणाच्या नियमात सारख्या शब्दांचे अथवा मात्रांचे नसले तरीही उच्चारताना आपल्या आंतरिक उर्जेचे आवर्तन आणि लय घेऊन येतात.

मुक्तछंदाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आता लिहिणार्‍यांना नवीन पेव फुटलेत  आणि ते म्हणतात आमची कविता छंदमुक्त आहे. मुक्तछंदाला विशिष्ट लय असते जे त्यांच्या कानावर येत असल्याने आणि स्वतःच्या लिखाणावर भरोसा नसल्याने त्यांनी आपल्या कवितेला छंदमुक्त म्हणावे का? आपले विचार आपले श्वास आपला आनंद आपले रडणे बोलणे या प्रत्येकाला नाद आहे लय आहे... म्हणून छंदही आहे. आपण जी मुक्तछंदातली कविता लिहित आहोत तो गद्याचा तुकडा कसा नाही हे जर स्पष्टपणे सांगू शकलो तर आपण मुक्तछंद लिहिण्यास पात्र आहोत. हेकेखोरपणाला इलाज नाही....कुणी म्हटला की गद्याचा तुकडा वाटत असला तरी मला कविता म्हणून सुचला आहे....अशा ठिकाणी आपण डोळे ,कान बंद करुन मार्ग बदलणे योग्य ठरेल.. मुक्तछंद आणि छंदमुक्त रचना यातील फरक जाणायचा असेल तर इंदिरा संतांच्या कविता अभ्यासायला हव्यात.  मुक्तछंदाला एक वेगळी उंची देताना अनेक दिग्गजांनी छंदबद्ध कवितेलाही त्याच ताकदीने पुढे नेले.

मुक्तिबोध बंधूच्या मुक्तछंदाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादापासून मुक्तछंदात कविता लिहिल्या जाऊ लागल्या असे वाचनात आले होते. छंदबद्ध कवितांच्या प्रस्थापित राज्यात क्रांती हवी आणि काळजाचा हुंकार जसाच्या तसा शब्दबद्ध करता यावा यासाठी मुक्तिबोधांनी क्रांतीच्या कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांमधून समकालीन आशयासोबत स्वप्नरंजनदेखील होते तरीही त्यांनी मुक्तछंदाला दर्जा दिला . (त्यात त्या काळातील छंदबद्ध कवींवर टिकाही केली हा भाग वेगळा.).

खरे तर मुक्तछंद कसा लिहावा पेक्षा मुक्तछंद कसा जगावा हे शिकून घ्यायला हवे. मुक्तछंद ज्याला जगता आला त्याला तो लिहिणेही सहज शक्य आहे. उत्तम मुक्तछंद म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने देत असतो. मी आजवर सर्व लिखाण वृत्तबद्ध करत आलो असलो तरीही काही नावे अशी आहेत की ज्यांच्या मुक्तछंदातल्या कविता वाचून त्या लिखाणाचा अत्यंत जास्त हेवा वाटतो. त्यांच्यासारखी एखादीतरी कविता आपल्याला लिहिता यावी असे वाटून जाते. खलील मोमीन सर जेव्हा भेटतात तेव्हा धामणस्करांच्या कविता ऐकवतात. या कविता ऐकताना होणारी मनाची अवस्था शब्दात मांडणे अशक्य आहे. विशेष सांगावे वाटते कि खलील मोमीन सरांसारखा सिद्धहस्त आणि वृत्तबद्ध काव्यात अजरामर लेखन करून ठेवलेला माणुस स्वतःच्या रचना न ऐकवता इतर कवींच्या कविता पाठ ठेवतो आणि ऐकवतो. दुसरी एक अशीच व्यक्ति आहे आमच्या नाशकात जे स्वतः सिद्धहस्त कवी आहेत तरीही कुठे कुणाला कविता ऐकवायच्याच तर ते नारायण सुर्वेंच्या कविता ऐकवतात. ते आदरणीय आहे कविवर्य संजय चौधरी . चौधरी सरांनी मुक्तछंदाला इतकी प्रियता मिळवून दिली की आज प्रत्येकजण त्यांच्यासारखा मुक्तछंद लिहू बघतोय. सोबतच त्यांनी छंदबद्ध कवितेचाही हात सोडला। नाही हे विशेष !!! आपला लाडका मित्र तनवीर सिद्दिकी गुलजारांच्या कविता ऐकवतो. याचे कारण त्या दिग्गजांचा या कवींवर प्रभाव नसून त्या आवडीच्या (एक किंवा अनेक किंवा सर्वच )कविता त्यांनी जगल्याची साक्ष आहे . तनवीर सुद्धा मुक्तछंदावर जेवढे प्रेम करतो तेवढेच वृत्तबद्ध साहित्यावर करतो हे नमूद करावे वाटते.  मुक्तछंद जसाच्या तसा पाठ ठेवणे म्हणजे काही गंमत नाहीये. (माझ्यासाठी तर ते अजिबात अजिबात शक्य नाहीय.) जो मुक्तछंद आपल्याकडून कळत नकळ्त जगला गेलाय तोच बहुधा आपल्याकडून आपोआप वदला जात असावा असे माझे मत मी बनवून घेतले आहे. तनवीर सिद्दिकीची कविता वाचताना त्यात अनुभवाच्या ऐरणीवर लालबुंद करुन ठोकलेली सामाजिक मानसिकता सिद्धांताच्या रुपात आपल्याला वाचायला मिळते. बघा ही कविता...

>>एक बी जिला हात लावला
ती म्हणाली मला वेल व्हायचंय
आधार दिल्यावर जेव्हा ती वेल झाली
तेव्हा म्हणाली मला झाड व्हायचंय
तिला कणा दिल्यावर ते झाड म्हणालं
मला तुम्हाला सावली द्यायचीय

त्या सावलीत बसून ज्या कविता लिहिल्या
त्या आता त्या झाडांना आवडत नाहीत..
मात्र पायापाशी एक अनाथ बी
ऐकत हसत असते

मला आता हात लावायची भीती वाटते
..कागदाला !

किंवा ही एक बघा...

>>एकेदिवशी स्वप्नात
समोर देव होता आणि त्याच्यासमोर मी

माझ्या हातात माझ्या जीवनाची वही होती
त्यात बेरीज होती, वजाबाकी होती
त्यात भागाकार होते, गुणाकार होते ..

देवाच्या हातात एक मूल होते
तो तिला विचारुन विचारुन पाणी पाजत होता

माझ्याकड़े हे नाही, ते नाही
मी रागात त्याच्याशी
बोलायला सुरवात करणार होतोच
की
तो हसत बोलला...
हिला ओळखतो ?

ही तुझी मोठी बहीण आहे वेड्या...
हिच्याकड़े 'जन्म' च नाही !

अलेले, गुड्डू, बघ तुझा भाऊ आलाय..
हा, तर तू काय बोलत होतास?

ऐनी प्रॉब्लम?

मुक्तछंदाला विशिष्ट लय असावी म्हणतात ....कोणती लय.. कशी लय...यावर मी या निष्कर्षावर आलोय की ही लय म्हणजेच आपल्या विचाराधीन मनाच्या आवर्तनांतून उत्पन्न होणारी कंपने. आता ही कंपने ओळखायची तरी कशी नेमकी? बहुतेक वेळा मुक्तछंदाच्या नावाखाली गद्य उतारे वाचून दाखवणारे लोक भेटतात आणि मग मुक्तछंदावर प्रश्नचिन्हे उभी राहू लागतात. मुक्तछंद जेव्हा मनाचे आवर्तन घेऊन बाहेर येतो तेव्हा कवितेच्या प्रत्येक ओळीत एक नादमय हुंकार जाणवतो. अशी कविता वाचताना अथवा ऐकतानासुद्धा फार प्रभावी वाटते.. कमालीची निरागसता आणि आशावाद दाखवणारी ही रचना बघा....रचना वाचताना मनात येते की कोणत्या मानसिक अवस्थेत संजय चौधरी सरांनी ही कविता सुचली असेल....असे कोणते चिंतन असेल ज्याने कवितेला एवढी प्रखरता आली असेल !!

>>मथुरेला गेलो
म्हटलं कृष्ण कुठं आहे ?
बोलवा जरा , सांगा भेटायला आलोय
तर उरलेले लोक म्हणाले
कृष्ण आता इथे रहात नाही
आता इथे बासरीचे सूर घुमत नाही

कृष्ण गेला
सोबत गोपी गेल्या
बासरी गेली गायी गेल्या
सोबत मथुराही गेली
आता यमुनेचं ते पाणी ही नाही
सगळं वाहून गेलंय

पण असं म्हणतात
जो भेटण्याची तहान घेऊन येतो
त्याला कान्हा भेटल्याशिवाय रहात नाही

घरी आलो
आरशात पाहिलं तर
चेहर्‍याच्या जागी मोरपीस......!!

कविता संपते तिथे आपण गोळा करुन ठेवलेल्या सर्व श्वासांना मोकळीक मिळते आणि आपोआप ओठावर(कुणाच्याही) स्मित तरळून जाते. हे स्मित म्हणजे प्रत्येकवेळी कवितेला मिळालेला पुरस्कारच नव्हे का !! खलील मोमीन सरांच्या तोंडपाठ झालेल्या शेकडो कविता धामणस्करांच्या आहेत. ज्या धामणस्करांनी लिखाणाला एक वेगळी उंची दिली. वास्तवाला समाजासमोर ठेवताना त्याला हळवेपणाचा साज चढवला आणि विश्वासाच्या कसोटीवर उतरलेले प्रेमसुद्धा व्यक्त केले... खाली तीन कवितांचे दाखले आहेत जे वाचल्या वाचल्या तुम्हाला धामणस्करांचे संग्रह वाचण्याचा मोह होईल.

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….(....)
**
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …(....)
**
प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.
मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,
उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखिल. मला
ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या
भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. (.....)
***
या आणि अशा अनेक रचना मुक्तछंदाच्या मांदियाळीत दिमाखाने उभ्या आहेत. आपल्यालाही आपली कविता या रांगेत उभी करायची असेल तर मुक्तछंदावर अन्याय न करता/ त्याला व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ देऊन / त्याला टाळ्या मिळवण्याचे साधन न मानता रांगत रांगत का होईना बाळसेदार होईपर्यंत सांभाळायला हवे...नारायण सुर्वेंची 'तुमचच नाव लिवा' किंवा कुसुमाग्रजांची " पाठीवरची थाप " म्हणा किंवा इंदिरा संतांची " सहज सहज टाकुन गेलास" असो प्रत्येक रचनेत त्यांनी आपल्या अंतर्मनाची निखळ आवर्तने भरली आहेत. आपणही आपल्या आत गुदमरणार्‍या मुक्तछंदाला हात देऊन मुक्ती देताना त्याच्या मुलभूत छंदाला जपण्याचा प्रयत्न करु या.....एक वाचकाच्या भुमिकेतून हा लेख लिहिलाय... भावनेच्या भरात काही चुकले असल्यास माफ कराल ही अपेक्षा (क्रमश:)

-- संतोष वाटपाडे