Saturday, August 2, 2014

प्राजक्त...

...प्राजक्त...

प्राजक्त पहाटे फ़ुलतो
वार्‍यात असा दरवळतो
पांढरा सडा थेंबांचा
अंगणात माझ्या दिसतो..

तांबडे देठ पानेरी
पानांची किलबिल दारी
अन फ़ुले बरसती जेव्हा
गालात जरासा हसतो...

आभाळी कृष्ण ढगांची
जमलेली दिसते गर्दी
पेलून फ़ुलांना सार्‍या
प्राजक्त तसा गजबजतो...

मृदगंध पसरतो रानी
मल्हार गरजतो कानी
मातीवर टपटप ऐसा
आवाज फ़ुलांचा असतो...

पाझरते चिंब सरींनी
दारातील सारी माती
प्राजक्त झर्‍यागत अवखळ
अंगणात सार्‍या पळतो...

या धुंद पहाटे माझ्या
अंगावर काटा फ़ुलतो
बघताना वाटत असते
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो......

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

पाऊस कधीचा पडतो

थकलेल्या डोळ्यांमधला पाऊस कधीचा पडतो
जोमात बहरली दुःखे उपवास तरी का घडतो

मेल्यावरसुद्धा उरतो का श्वास उराशी बाकी
कौलावर घास गिळाया कावळा पुन्हा ओरडतो

दगडांनी काबिज केली वावरात काळी माती
दारात बैसला बाबा लाचार अजुनही रडतो

झाडावर अंध गिधाडे हुंगतात वार्‍यालाही 
कुरणातील बैल बिचारा आखरी लढाई लढतो

हंबरते खुंट्याभवती झोपडी प्राण जाताना
हुंदका चुलीचा तेव्हा राखेत पिलागत दडतो

सावली पेटते जेव्हा अडखळल्या पायाखांली
बांधावर कुणबी वेडा नशिबास शिव्या हासडतो..

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा 
माझ्या भुईला भिजवू
लोक पाहतात सारे 
नको उगाच लाजवू

तिची ओली झाली साडी 
वारा झोंबतो अंगाला
नको पाहू टकमक 
तिच्या सोनेरी रंगाला

निथळती कोर्‍या सरी
गोर्‍या गोर्‍या कायेवरी
निळे उत्ताण डोंगर
झाले तेव्हा भरजरी

थेंब साचले चंदेरी
पापणीच्या पानावर
तुझी नजर फ़िरते
ओलावल्या रानावर

केस मोकळे सुटले
पदराचा मेळ नाही
जा रे लबाडा माघारी
पहा वेळकाळ काही

तिने लपावे रे कुठे
आडोशाला घर नाही
तिच्या संयमाला वेड्या
कुणाचीही सर नाही

-- संतोष वाटपाडे (नाशिक)