Tuesday, December 9, 2025
Monday, February 26, 2024
नवरस
रौद्र रस
ख्रिस्तपुर्व काळात वेदांमधील साहित्यिक कलांचा अभ्यास करून "नाट्यशास्त्र" हा अनमोल ग्रंथ लिहिणार्या भरतमुनींनी विविध अनुभूतींमधून प्राप्त होणार्या स्थायी भावांना रस संबोधले . रस ही नाट्य, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. ...भरतमुनींनी त्यांच्या चिंतनातून उतरलेल्या शास्त्रात आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. त्यात श्रृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स आणि अद्भुत या रसांचा समावेश होता मात्र पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.
ज्याचा आस्वाद घेतला जातो तो रस अशी साधी सोपी व्याख्या करून मानवी विचारप्रक्रियेत तयार होणार्या प्रसंगारूप भावनांना नऊ रसांमधे विभाजित केले गेले. स्थायी म्हणजे तो भाव जो आपल्या चित्तात वासनात्मक किंवा कामनात्मक रुपात चिरकाल टिकून राहतो. मनुष्यप्राण्याच्या विचारप्रक्रियेत असलेल्या व्यभिचार भावाच्या उपस्थितीमुळे विविध रसांचा आस्वाद घेणे शक्य होते. स्थायी भाव , विभाव ,अनुभाव ,अष्टसात्विक भाव यांच्या प्रकियेतून रसनिष्पत्ती होते. आस्वाद घेणे म्हणजे स्थायी भाव. कशामुळे स्थायी भाव निर्माण झाला ते कारण म्हणजे विभाव. विभावामुळे चित्तावर झालेला दृष्य परिणाम म्हणजे अनुभाव. कुठल्याही एका भावावर स्थिर न राहण्याची वृत्ती म्हणजे व्यभिचार भाव. व्यभिचार भावामुळे देहात उत्पन्न होणारे भाव म्हणजे अष्टसात्विक भाव .अष्टसात्विक भाव म्हणजे स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा राहणे), स्वरभंग (आवाजात बदल होणे), कंप (शरीराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मुर्च्छित होणे)
थोडक्यात सांगायचे तर रसउत्पत्ती ज्या कारणामुळे होते ते कारण म्हणजे "विभाव". विभावाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आलंबन विभाव. ज्या कारणामुळे /क्रियेमुळे रसाची उत्पत्ती झाली ते म्हणजे आलंबन विभाव. (उदा. प्रियकर-प्रेयसी बागेत भेटतात तेव्हा त्यांच्यात प्रणयभाव निर्माण होतो म्हणून हे जोडपे आलंबन विभाव आहेत ).दुसरा प्रकार आहे उद्दीपन विभाव. आलंबन विभाव ज्या कारणांमुळे उद्दिपित झाला ते कारण म्हणजे उद्दिपन विभाव. (उदा. ते दोघे बागेत भेटतात आणि बघतात की तिथे झाडावर फुले उमलली आहेत आणि पक्षांच्या ध्वनीतून प्रणयाराधना ऐकू येतेय. या दोन कारणांनी त्यांच्या मनात/देहात प्रणयभाव बळावला. तर ही अतिरिक्त कारणे म्हणजे उद्दिपन विभाव) व्यभिचार या शब्दाचा अर्थ जरीही आजकाल वेगळा सांगितला जात असेल तरी त्याचा अभिप्रेत अर्थ भरतमुनींनी पुर्वीच सांगितला आहे. व्यभिचार म्हणजे भावनांची चंचलता. कोणत्याही एका भावनेवर स्थिर न राहण्याची चित्तवृत्ती !
प्रत्येक रस आणि त्याची सिद्धता उदाहरणे हे अत्यंत गहन आणि आनंददायी काम असले तरी आपण या नऊ रसांपैकी एक असलेला रौद्र या रसाबद्दल जाणून घेऊ या. क्रोध ही भावना घटना, प्रसंग, अभिनय यातून सिद्ध करत मेल्यावर तिच्यातून रौद्र रसाची निर्मिती होते. प्रत्येक शब्दावर जोर देऊन, रागाने लाल होऊन, वरच्या आवाजात बोलून एखादी व्यक्ती तिच्या भावना व्यक्त करते त्यावेळी तिचे डोळे विस्फारलेले असतात, रागाने अंगाचा थरकाप होत असतो, भुवया वर चढलेल्या असतात. ही सगळी लक्षणे रौद्र रसाची आहेत. क्रोध चीड किंवा रागाचे वर्णन जिथे जिथे असते तिथे तिथे रौद्ररस प्रगट होतो.
१) स्थायी भाव - क्रोध
२) आलंबन भाव - ज्यांच्यामुळे क्रोध आला ती/त्या व्यक्ती
३) उद्दीपन भाव - कशामुळे क्रोध ते कारण
४) अनुभाव - क्रोधामुळे झालेला परिणाम.उदा. चेहरा लाल झाला , दातांची सळसळ ,मुठी आवळल्या ,गर्जना इत्यादी
५) अष्टसात्विक भाव- उद्वेग , आवेग , चीड ,मद , मोह , उग्रता इत्यादी
शृंगार रस
कोवळ्या उन्हांनी घ्यावा वेचुन धुंद प्रियेचा रंग
दरवळतो आहे रोम रोम लखलखते आहे अंग
विस्कटलेल्या केसांमधुनी रतिचंद्र उगवला आहे
अन तळव्यावरची मेंदी आहे स्वप्नप्रदेशी दंग...
............................
हास्य रस
अडकून पाय पायात धपटली उन्हे प्रियेच्या दारी
उसळून धूळ नाकात चालली अंगणातली सारी
चोळून नाक लावून हात स्पर्शण्या प्रियेला माझ्या
वेंधळ्या उन्हांची पितांबरे दिसली मज भळभळणारी...
.................................
करूण रस
लाघवी उन्हे झुकवून मान थांबली प्रियेच्या दारी
पापणीतली आसवे वाहिली अंगणामधे सारी
स्पर्शण्या तिला आर्जवे किती ओठात कोंडली त्यांनी
हुंदक्यातली एकेक हाक जाणवली गहिवरणारी...
.............................
रौद्र रस
छाटेन पाय आता जरका आलात तुम्ही दारात
चोंबड्या उन्हांनो नकात राहू फिरण्याच्या नादात
माझिया प्रियेची झोप मोडली तुम्ही येउनी जरका
सांगून ठेवतो तुम्हास मी जाळेन आज सरणात ....
.............................
वीर रस
कोवळी उन्हे वेगात धावली पुन्हा प्रियेच्या दारी
पाहून प्रियेची मोहकता रांगेत थांबली सारी
धावून तिच्यावर स्पर्श त्वचेचा वेचायाचा होता
बेचैन उन्हांची नजर त्याक्षणी दिसली भिरभिरणारी...
..............................
भयानक रस
पाडून कुणाचा खून धावले ऊन प्रियेच्या दारी
हत्यार जुने पाउले उमटली लाल अंगणी सारी
पकडून गच्च बाहूत प्रियेचा स्पर्श वेचण्यासाठी
या धुर्त उन्हाची मत्त लालसा होती डचमळणारी....
..............................
बीभत्स रस
शेंबडी उन्हे चाटून नाक धावली प्रियेच्या दारी
थुंकून भिजली त्यांनी माती अंगणातली सारी
स्पर्शता तिला हातावर दिसली चिकट चिकटसी लोळी
शेंबूड मला वाटला त्याक्षणी चमकी चमचमणारी....
..............................
अद्भूत रस
झालीत प्रकट ही उन्हे कोठुनी पुन्हा प्रियेच्या दारी
स्पर्शाने त्यांच्या अंगणातली फुले उजळली सारी
अलवार गुप्तरूपात जाऊनी स्पर्श तिला करण्याला
जादुई उन्हांनी केली त्यांची कायाही सोनेरी...
..............................
शांत रस
दारात प्रियेच्या नये पाझरु ...पिवळ्याजर्द उन्हांनी
अंगणासही रंगवू नये पायाच्या नितळ खुणांनी
मी येताना आणेन केतकीफुले कस्तुरी गंधाची
सजवेन प्रियेच्या केसांना या ओल्याचिंब फुलांनी..
-- संतोष वाटपाडे
Thursday, November 9, 2023
Wednesday, August 16, 2023
Monday, August 14, 2023
नमस्कार माझा तुला भारता
तुझी दिव्यगाथा लिहू पाहतो मी खुजे शब्द माझे खुजी व्यक्तता
नव्हे विप्र मी वा नव्हे ब्रह्मज्ञानी नमस्कार माझा तुला भारता ...
युगे कैक गेली तरी संपले ना तुझे तेज रश्मीकरासारखे
तुझ्या पंखमायेवरी लुब्ध आम्ही तुझ्या लाडक्या लेकरासारखे
कळेना कशी काव्यरूपात घ्यावी प्रभो लेखणीने तुझी भव्यता
करावा लिखाणास प्रारंभ कैसा करावी कशी त्यातुनी सांगता..
तुझी सावली भव्य रत्नाकराची हिमाद्री तुझ्या ठेवला मस्तकी
फुले विंध्यमालेतल्या पर्वतांची जशी गुंफलेली तुझ्या मंचकी
अलंकार देही तशी भिन्न राज्ये तरी संस्कृतीची दिसे साम्यता
अनंतात नावाजली अग्रस्थानी तुझ्या भिन्नतेतील एकात्मता
किती वंश वाडे किती वेष भाषा तुझ्या आत आहेत सामावल्या
नद्या वृक्ष प्राणी तुला देवस्थानी जशा मंत्रमाला तपस्येतल्या
जगी हासते न्यूनता मंदबुद्धी म्हणे एवढे देव का मानता
अशांना जरा सांग मौनातुनी तू इथे देवता हीच शालीनता
गुणी औषधे कैक धातू नि रत्ने जणू मानवाला तुझी देणगी
खरी विश्वशक्ती कुठे शोधताना तुझे नाव ही एकटी वानगी
सहा दिव्य शास्त्रातल्या तंत्रविद्या पुराणे तुझी ज्ञात प्राविण्यता
उभे विश्व झोळीत घेऊन जाते तुझ्या काळजातील औदार्यता
रिपू लाख आले कटू कामनांनी तुझे तेज त्यांनी लुचू पाहिले
घरे जाळली ध्वस्त संसार केला तुझ्या अर्भकाना जिवे मारले
जगी श्रेष्ठ तू धीट तू हिंददेशा तुझे अंश विश्वातली नम्रता
तरी क्रूरतेला पराभूत केले अशी थोर आहे तुझी शांतता..
महादिव्यशक्तीस्थळे जन्मलेली इथे मंत्रसामर्थ्यही निर्मिले
जगी कोणते ना असे शास्त्र आहे जसे वेदवाक्यातुनी जन्मले
तुझे गर्भसंस्कार घेऊन आम्ही जगाला दिली ईश्वरी बंधुता
पुन्हा लाभली फक्त माणूसकीला तुझे नाव घेण्यामुळे मान्यता
अहोरात्र साहित्य निर्माण होते तुझा अंश घेऊन रक्तामधे
जसा देव संचारतो चिंतनाने कुण्या ज्ञानव्याकूळ भक्तामधे
मती अल्प माझी गती शून्य माझी तरी मांडली मी तुझी गूढता
तुला वंदितो आज शब्दातुनी मी नमस्कार माझा तुला भारता...
- संतोष वाटपाडे
लढेन मी
बुलंद निश्चयातुनी स्मरेन आतला हरी
पुढ्यात ठाकली कधी कठोर संकटे जरी
परिश्रमातल्या व्यथेत नेहमी हसेन मी
हरेक संकटासवे लढेन मी लढेन मी ..
पडेन एकटा कधी असून लोक भोवती
खचायचो न मी जरी कुणी नसेल सोबती
अव्हेरत्यास , दुश्मनासही सखा म्हणेन मी
हरेक संकटासवे लढेन मी लढेन मी ..
विशाल स्वप्न पाहणे जगास वाटला गुन्हा
असा गुन्हा करेन जीवनात मी पुन्हा पुन्हा
कधी पडायचे कधी उठायचे शिकेन मी
हरेक संकटासवे लढेन मी लढेन मी ..
नशीब धीर पाहण्या असेल घेत चाचणी
कधी फुटेल हुंदका कधी भिजेल पापणी
जटील चक्रव्यूह पार सर्वदा करेन मी
हरेक संकटासवे लढेन मी लढेन मी ..
कधी नसेल चालण्यास पायवाट एकही
असून पंख कैकदा जमायची न झेपही
हजारदा पडूनही उठेन मी जगेन मी
पराभवास डावलून जिंकण्या.. लढेन मी
- संतोष वाटपाडे
मृत्यू हा पर्याय नव्हे
पराभवाच्या दुःखावरती मृत्यू हा पर्याय नव्हे
हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे ...
फार काळ एका जागेवर थांबत नसते संपत्ती
कर्माच्या मोबदल्यामधून मिळते गरिबी श्रीमंती
भाळी लिहिला नियतीने पण गरिबी हा अन्याय नव्हे
हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे ..
गरीब वा श्रीमंत असू द्या नियतीची आहेत पिले
जे जे घडते योग्यच घडते नियती करते तेच भले
तिने दिलेला निर्णय म्हणजे दारिद्र्याची हाय नव्हे
हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे....
व्यवसायांचे कर्ज असो वा कर्तव्यांचा भार असो
नात्यांचे तुटणे विस्कटणे वा पाठीवर वार असो
फास घेउनी.. परिवारावर जो होतो तो न्याय नव्हे
हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे....
हसणारे हसतील हसू द्या ...तेही हवेच प्रगतीला
सच्चे असतिल मित्र आपले धावत येतिल मदतीला
मनगटातली जिद्द पाहिजे डगमगणारा पाय नव्हे
हरणे बिरणे जीवनातला शेवटचा अध्याय नव्हे...
- संतोष वाटपाडे
Thursday, March 7, 2019
Friday, February 1, 2019
तुम्ही कवी आहात ??
तुम्ही कवी आहात !!! तुम्ही मुक्तछंदात लिहिता !!! मला तर फार आवडतात मुक्तछंद ..... बरं तुम्हाला वृत्तबद्ध कविता नावाचा प्रकार आपल्या साहित्यात आहे हे माहितीय का???? नसेल तर माहीत करून घ्याल का??? वृत्तबद्ध लिखाण शिकू नका हो ..... मात्रा बित्रा मोजू नका .... फक्त माहिती असू द्या की असाही एक प्रकार साहित्यात आहे...
हे वर लिहिलेले स्वगत आहे पण हे मनात येण्यामागची कारणेही तशीच आहेत. अगदी सुरुवातीलाच मुक्तछंदातली कविता मुलांच्या अंगात पेरली गेली , मुरवली गेली किंवा रुजवली गेली , त्याच वेळी वृत्तबद्ध कविता प्रकार किमान कानावर टाकायला हवा होता किंबहुना टाकायला हवा असे मला वाटते. पुढे ज्याची त्याची आवड आहे आणि आवडीनुसार क्षेत्र निवडले जाईलच ही नैसर्गिकता आहे. आज एखादा कवी जेव्हा भूत पाहिल्यासारखा वृत्तबद्ध कवितेला बघतो तेव्हा वाईट वाटण्याऐवजी त्याची कीव वाटते. हा प्रकार इथपर्यंत गेलाय की वृत्तबद्ध कविता म्हणजे आजकालच्या काही लोकांनी साहित्यिक काड्या करून काहीतरी वेगळे शोधून आणले असावे आणि त्याला काही एवढे मनावर घ्यायचे नसते असे काही कवींच्या हावभावातून जाणवते.
कुण्या एका प्रकाराची बाजू घेऊन दुसऱ्याला कमी लेखणे हा माझा उद्देश नाहीय. माझे म्हणणे आहे की तुम्ही किमान दखल तर घ्या ... वृत्तबद्ध कविता अथवा गजल आशयाला परिपूर्ण न्याय देऊ शकते आणि मुक्तछंदात जे मांडायचे तेही शिस्तीत मांडू शकतात... मंचावर मोठमोठ्याने ओरडून, छाती बडवून सादर केलेल्या आणि टाळ्या मिळवणाऱ्या रचना खरोखर कविता आहेत का??? कुणी यावर चर्चा करायला तयार आहे का? मुळात त्याचा शोध कुणाला घ्यायचा नाहीय... नाटक, कविता, गीत या प्रकारात भिन्नता आहे ना .... मग आपण जे मुक्तछंद म्हणून सादर केले ते एकपात्री नाटक तर नव्हते???? बहुतांश कविता तशाच जाणवतात आजकाल..... चार मोठी पाने भरतील एवढ्या लांबीची ही कविता सादर करताना तो कवी मांडी थोपटतो , हातवारे करतो ,अभिनय करतो तेव्हा तो नाटक सादर करत असतो आणि आपण त्याला कविता समजून दाद देत राहतो... मुक्तछंद म्हणजे गंम्मत वाटते लोकांना ... स्वतःशी झालेला संवाद असा मंचावर आरडाओरड करून सादर करायचा असतो का??? अर्थात सादरीकरण हा मोठा विषय आहे ...पण त्यावर आपण नंतर कधी चर्चा करू ... सादरीकरण आणि अभिनय हे वेगवेगळे पैलू आहेत हे मात्र जाणून घ्यावे ...
मला मुक्तछंद लिहिता येतो किंवा छान लिहिता येतो असा माझा गैरसमज अजिबात नाहीय. मात्र मला तो खूप चांगल्या रीतीने ओळखता येतो आणि जगताही येतो यावर मी ठाम आहे. वर्णनात्मक कविता मुक्तछंदातून मांडणे म्हणजे केवढी मोठी मस्करी आहे मुक्तछंदाची आणि केवढा मोठा अपमान आहे गद्याचा !!! मुक्तछंदाला विषयांचे बंधन असायला नसले तरी कोणते विषय वर्ज्य आहेत हेही लिहित्या हातांनी ओळखायला हवे....
रानातल्या झाडांना
हिरवी हिरवी पाने आलेली आहेत
आणि फांद्यांवर काही फळेसुदधा
लागलेली दिसत आहेत
त्याच झाडावर काही पक्षांनी
घरटी बांधलेली आहेत....
हिला कविता म्हणायचे का? मग गद्य काय आहे? ... आता बघा ! संवादातून जन्म घेणारी कविता आहे तर तिचा आशय सुद्धा तसाच असावा की नाही? ..... काही व्यक्तींचा आपसात चाललेला संवाद या कवितेत कसा घेऊ शकतो आपण??
ती म्हणाली" मी बाजारात चालले"
मग मी म्हणालो "कशाला"
ती पुटपुटली "भाजी आणायला"
मग ते म्हणाले "आम्हीही येऊ का"
शेवटी ती म्हणाली "नाही मीच जाऊन येते"
असे गद्याचे तुकडे केल्याने कविता बनते का कधी?.... काही लोक तर याला सुद्धा चाल लावून सादर करतात !!! चाल लावून सादर करणारा वर्ग आजकाल वाढलाय हे वेगळे सांगायला नकोय... याला प्रशंसेचा हव्यास कारणीभूत आहे .काही कवी गातातही छान, त्यांच्या कविता असतातही सुंदर मान्य आहे . माझे अनेक जवळचे मित्र- मैत्रिणी तसेच वलयातले अनेक लोक उत्तम गातात आणि लिहितात सुदधा...ही ईश्वरदत्त देणगी आहे यावर माझा विश्वास आहे ...पण म्हणून सर्वांनीच गायला हवे का? आणि वरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य याविषयावर बोलायला तयार असतात लोक.. ओघात विषय आला म्हणून तरन्नुम वर घसरलो .... मुद्दा तो नाहीच आहे आपला….
मुळात कवितेवर होत असलेले कुसंस्कार टाळले गेले पाहिजेत आणि हे प्रकार सर्व साहित्यिकांनी मिळून करायला हवेत. एकीकडे व्हाट्स अप वर कवितासदृश अनेक पदार्थ हिंडत असतात जे कविता प्रकारात मुळीच मोडत नाही तरीही कवितेची ओळख नसलेले लोक कविता समजून त्यांच्या समूहात आनंदाने शेअर करतात ... आणि मग ते लोक वाहवा करत सुटतात.... इथून पुढे एक पिढी त्या पदार्थालाच कविता समजत राहते ही बाब फार गंभीर आहे.... सर्वगुणसंपन्न वृत्तबद्ध कविता, गजल , मुक्तछंद अथवा कोणतीही कलाकृती कशी असते हे वाचकांना समजावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे ... व्हायरल झालेल्या अनेक कविता(?) एकदम भंकस असतात तरीही लोक वरती केप्शन टाकतात .... "माझ्या वाचनात आलेली आजवरची सर्वात सुंदर कविता" ....असे कसे म्हणू शकतात राव !!! आयुष्यात जर तुम्ही मोजून 2 4 कविता वाचल्या असतील आणि त्यात ही अर्थहीन कविता तुम्हाला आवडली असेल तर काय करणार ?? आजूबाजूच्या किमान शंभर लोकांच्या मनावर ही कुसंस्कारीत कविता स्वार होऊन बसणार.
जेव्हा शालेय अभ्यासक्रमात कविता पाठ करणे शिकवले जाते त्याचवेळी मुलांना सर्व काव्यप्रकार शिक्षकांनी शिकवायला हवेत. वृत्तबद्ध/ गेय कविता का जन्माला आली किंवा तिचे फायदे काय हेही सांगायला हवे. पुढे जाऊन मुक्तछंद कविता कशी उदयास आली आणि तिच्या लेखनातून आपल्याला कसे समृद्ध होता येते हेही शिकवले पाहिजे. यासाठी स्पेशल आठ तास शिकवले पाहिजे असेही काही नाहीय. अर्धा तासात समजावले तरी मुलांना फरक तरी कळेल आणि प्रकार तरी माहिती होतील. शिक्षकांना याचे महत्व माहिती असावे. व्याकरण, बोली भाषा, कविता, मांडणी यावर काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक मेहनत घेताना दिसतात हे खरे असले तरी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी सोयीस्कर रीतीने वगळल्या जातात. पोट भरण्यापूरते शास्त्रीय/ गणितीय शिक्षण देताना कलेला अव्हेरले जातेय याकडे कुणाचे लक्ष नाहीय. कोणतीही कला खरेतर गणित अथवा शास्त्रांचा पाया आहे हे का समजावले जात नाही विद्यार्थ्यांना ? वर्षाभरात फक्त मराठी दिनानिमित्त मराठी कवितेला शाळा-कॉलेजमध्ये पाहुणी म्हणून बोलवाल आणि इतर दिवस तिला टाळाल तर तिचा आणि मुलांचा विकास कसा होणार? कविता ही आर्थिक उत्पन्नाचे साधन नसले तरी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या सर्व साधनांचे मूळ आहे . कारण कविता ही आत्मिक ऊर्जा आहे म्हणून ती सुसंस्कारित असणे फार गरजेचे आहे.
जे सुजाण पालक मुलांना वाचनाची गोडी लावतात आणि ज्यांना साहित्यात खरेच स्वारस्य आहे त्यांनीही त्यांच्या मुलांना कविता आणि अकविता यातला फरक सांगायला हवाय. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे चांगल्या कविता दडून राहतील आणि कविता नसलेल्या गोष्टी पुढे जातील अशी शक्यता नाकारता येत नाही. आजकाल तथाकथित आश्रमातून/ मठातून काव्यावर रोज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. फाफडयाच्या आकाराची कविता, जिलेबीच्या आकाराची कविता, खमण ढोकळा, असेंडिंग कविता , डिसेंडिंग कविता , सुप्रभातीय कविता !!!! वाट लावलीय राव लोकांनी .... शून्य भांडवलात सुरू करायचा व्यवसाय आहे जणू !!! त्यात पुन्हा यांच्या स्पर्धा होतात आणि हे प्रमाणपत्र सुद्धा देतात विजेत्यांना ..... कमाल आहे की नाही ? एकतर फाफडीय कविता तुम्ही उदयास आणून इतर सर्व प्रकारांचा अपमान करत आहात त्यात वरून त्यांना पुरस्कार देत आहात म्हणजे ही बंडखोरी झाली.
मी वृत्तबद्ध कविता, गजल यांच्यावर नितांत प्रेम करतो पण तेवढेच प्रेम मुक्तछंदावरसुदधा करतो हे पुन्हा एकदा नमूद करावे वाटतेय. माझ्या मित्रयादीत असेही मित्र आहेत जे उत्तम मुक्तछंद लिहितात आणि सोबत वृत्तांची माहिती करून घेतात. वेळ आल्यास त्यावर चर्चाही करतात. सर्वाना सर्वच प्रकार एकाच वेळी,सारख्याच ताकदीने हाताळता येतील असेही काही नाही त्यामुळे ती अपेक्षा करणे चुकीचे आहे. माझे म्हणणे केवळ इतकेच आहे की साहित्यात असलेल्या इतर प्रकारांची तुम्ही माहिती ठेवा आणि तिचा प्रसार सुद्धा करा ,जेणेकरून लोक अंधारात राहणार नाहीत आणि चुकीच्या मार्गाला सुद्धा जाणार नाहीत. प्रत्येकाची वृत्ती, अभिरुची त्याला योग्य त्या वेळी साक्षात्कार देईलच. वाईट गोष्टींना वाईट वाईट म्हणणे गरजेचे आहे. दर्जेदार लिखाण वाचकापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि निकृष्ट लेखन जागीच थोपवले पाहिजे. गुणवत्ता आधारित निकष कवितेला लागायला हवेत नाहीतर येत्या काळात साहित्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि त्याचे परिणाम पुढच्या सर्व पिढ्याना भोगावे लागतील . बस इतकंच ....
-- संतोष
Saturday, September 8, 2018
खरी लढाई नंतर आहे
शिक्षण शाळा पुर्वतयारी जरी वाटते खडतर आहे
मुलामुलींनो आयुष्याची.. खरी लढाई नंतर आहे....
अभ्यासाला लवकर उठणे.. तुम्हा वाटते शिक्षा आता
करमणुकीवर बंधन आले म्हणून का संतापुून जाता
जरी वाटतो सपाट रस्ता मित्रांनो हा डोंगर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे...
पप्पा मम्मी ओरडले तर चिडू नका वा नका ओरडू
आजारावर रामबाण औषध खात्रीने असणार कडू
भविष्य तुमचे जीवन तुमचे...चिडणे प्रेमाखातर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे....
कमी वयातिल प्रेम असो वा आकर्षण वा तसेच काही
त्यांच्यावरती निर्णय घेण्या नको कधीही कसली घाई
मैत्री टिकते...प्रेम वगैरे सारेकाही वरवर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे...
घटक चाचण्या पुर्व परिक्षा किंवा असेल मुख्य परिक्षा
जीवन घेते संस्कारांची क्षणाक्षणाला नकळत दिक्षा
बागडण्याला अभ्यासाची सदैव साथ खरोखर आहे
मुलामुलींनो आयुष्याची खरी लढाई नंतर आहे....
-- संतोष
Tuesday, August 21, 2018
मुक्तछंद
कमालीचे ढेपाळलेपण एकंदर मराठी कवितेत दिसून येतेय. हेकेखोरपणा आणि स्पर्धा या दोन ज्वालामुखींच्या तोंडातून दिवसेगणिक वाहत चाललेला कविता नावाचा लाव्हारस एक दिवस नक्कीच खडकासारखा कडक ,निर्जीव होईल आणि मातीत धसून जाईल हे निश्चित... एक चमू असा आहे जो म्हणतोय की कविता जशी सुचली लिहू... तिच्यावर संस्कार करणार नाही. दुसरा चमू म्हणतो आधी संस्कार शिकून घ्या मग येणारी कविता आपोआप तो रंग घेऊन येईल. तिसरा चमू म्हणतो या दोन्ही चमूंना लिखाणाचे ज्ञान नाही. एखादा सरळ सरळ सुरेश भटांच्या अनमोल लिखाणावर टिका करुन जातो. कुणी म्हणतो ग्रेसांच्या कविता म्हणजे दुर्बोध असतात, मंगेश पाडगावकर फार सामान्य लिखाण करायचे आणि एखादा म्हणतो ढसाळांची कविता वाचावीशी वाटत नाही. हा प्रकार आहे तरी नेमका काय?? आपण आपल्या बाळबोध बुद्धीनुसार इतर लोकांचे मुल्यमापन करणार आहोत का? मूल्यमापन करण्याची आपली फूटपट्टी callibration केलेली आहे का? इतर कुणाच्या साहित्यावर बोट ठेवण्यापुर्वी आपल्या स्वतःच्या लिखाणाचे,ज्ञानाचे किवा वाचनाचे मुल्यमापन आपण करुन घ्यायला नको का?
बोटावर मोजणारे समिक्षक उरलेत आता आपल्या हातात. त्यांनाही मनसोक्त लिहिण्याची मुभा कदाचित राहिली नसावी. साहित्याचे मुल्यमापन करताना त्याचे रसग्रहण करता आले पाहिजे. कविता वाचली /आवडली मान्य पण नेमके काय आवडले आणि कविता वाचली /नाही आवडली तर नेमके काय नाही आवडले या दोन्ही गोष्टींचे सकारण उत्तर रसग्रहणासोबत देऊ शकतोय का आपण?? काम असते,जबाबदार्या असतात , वेळ मिळत नाही म्हणून साहित्यावर सकस अभिप्राय लिहिणे जमणार नाही असे आपण मोठ्या दिमाखात सांगतो आणि याउलट याच घाईत याच धावपळीत एखादी रचना वाचून पटकन तिच्यावर ताशेरे ओढून जातो आपण. उत्तम साहित्याला सविस्तर उत्तम म्हणायला आपल्याला कमीपणा वाटतो आणि उत्तम(?) नसलेल्या साहित्याला अगदी तज्ञ असल्यासारखे कसे उत्तम नाही हे पटवून देतो.
आपल्या अंतर्मनातील विचारांच्या समुद्रात चांगल्या वाईट विचारांच्या लाटा नेहमी उसळत असतात. या लाटांचा वेग काही काळ तरी सारखा असतो. ही घटना सतत तीव्रतेने घडत असल्याने आपण हीला विचारांची वारंवारीता म्हणू या. ही वारंवारीता एखाद्या कल्पनेबद्द्ल,स्वप्नाबद्दल,घटनेबद्द्ल जेव्हा एका नियमित गतीने व्यक्त होऊ लागते तेव्हा गद्याचे तुकडे पडू लागतात. जे व्याकरणाच्या नियमात सारख्या शब्दांचे अथवा मात्रांचे नसले तरीही उच्चारताना आपल्या आंतरिक उर्जेचे आवर्तन आणि लय घेऊन येतात.
मुक्तछंदाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आता लिहिणार्यांना नवीन पेव फुटलेत आणि ते म्हणतात आमची कविता छंदमुक्त आहे. मुक्तछंदाला विशिष्ट लय असते जे त्यांच्या कानावर येत असल्याने आणि स्वतःच्या लिखाणावर भरोसा नसल्याने त्यांनी आपल्या कवितेला छंदमुक्त म्हणावे का? आपले विचार आपले श्वास आपला आनंद आपले रडणे बोलणे या प्रत्येकाला नाद आहे लय आहे... म्हणून छंदही आहे. आपण जी मुक्तछंदातली कविता लिहित आहोत तो गद्याचा तुकडा कसा नाही हे जर स्पष्टपणे सांगू शकलो तर आपण मुक्तछंद लिहिण्यास पात्र आहोत. हेकेखोरपणाला इलाज नाही....कुणी म्हटला की गद्याचा तुकडा वाटत असला तरी मला कविता म्हणून सुचला आहे....अशा ठिकाणी आपण डोळे ,कान बंद करुन मार्ग बदलणे योग्य ठरेल.. मुक्तछंद आणि छंदमुक्त रचना यातील फरक जाणायचा असेल तर इंदिरा संतांच्या कविता अभ्यासायला हव्यात. मुक्तछंदाला एक वेगळी उंची देताना अनेक दिग्गजांनी छंदबद्ध कवितेलाही त्याच ताकदीने पुढे नेले.
मुक्तिबोध बंधूच्या मुक्तछंदाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादापासून मुक्तछंदात कविता लिहिल्या जाऊ लागल्या असे वाचनात आले होते. छंदबद्ध कवितांच्या प्रस्थापित राज्यात क्रांती हवी आणि काळजाचा हुंकार जसाच्या तसा शब्दबद्ध करता यावा यासाठी मुक्तिबोधांनी क्रांतीच्या कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांमधून समकालीन आशयासोबत स्वप्नरंजनदेखील होते तरीही त्यांनी मुक्तछंदाला दर्जा दिला . (त्यात त्या काळातील छंदबद्ध कवींवर टिकाही केली हा भाग वेगळा.).
खरे तर मुक्तछंद कसा लिहावा पेक्षा मुक्तछंद कसा जगावा हे शिकून घ्यायला हवे. मुक्तछंद ज्याला जगता आला त्याला तो लिहिणेही सहज शक्य आहे. उत्तम मुक्तछंद म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने देत असतो. मी आजवर सर्व लिखाण वृत्तबद्ध करत आलो असलो तरीही काही नावे अशी आहेत की ज्यांच्या मुक्तछंदातल्या कविता वाचून त्या लिखाणाचा अत्यंत जास्त हेवा वाटतो. त्यांच्यासारखी एखादीतरी कविता आपल्याला लिहिता यावी असे वाटून जाते. खलील मोमीन सर जेव्हा भेटतात तेव्हा धामणस्करांच्या कविता ऐकवतात. या कविता ऐकताना होणारी मनाची अवस्था शब्दात मांडणे अशक्य आहे. विशेष सांगावे वाटते कि खलील मोमीन सरांसारखा सिद्धहस्त आणि वृत्तबद्ध काव्यात अजरामर लेखन करून ठेवलेला माणुस स्वतःच्या रचना न ऐकवता इतर कवींच्या कविता पाठ ठेवतो आणि ऐकवतो. दुसरी एक अशीच व्यक्ति आहे आमच्या नाशकात जे स्वतः सिद्धहस्त कवी आहेत तरीही कुठे कुणाला कविता ऐकवायच्याच तर ते नारायण सुर्वेंच्या कविता ऐकवतात. ते आदरणीय आहे कविवर्य संजय चौधरी . चौधरी सरांनी मुक्तछंदाला इतकी प्रियता मिळवून दिली की आज प्रत्येकजण त्यांच्यासारखा मुक्तछंद लिहू बघतोय. सोबतच त्यांनी छंदबद्ध कवितेचाही हात सोडला। नाही हे विशेष !!! आपला लाडका मित्र तनवीर सिद्दिकी गुलजारांच्या कविता ऐकवतो. याचे कारण त्या दिग्गजांचा या कवींवर प्रभाव नसून त्या आवडीच्या (एक किंवा अनेक किंवा सर्वच )कविता त्यांनी जगल्याची साक्ष आहे . तनवीर सुद्धा मुक्तछंदावर जेवढे प्रेम करतो तेवढेच वृत्तबद्ध साहित्यावर करतो हे नमूद करावे वाटते. मुक्तछंद जसाच्या तसा पाठ ठेवणे म्हणजे काही गंमत नाहीये. (माझ्यासाठी तर ते अजिबात अजिबात शक्य नाहीय.) जो मुक्तछंद आपल्याकडून कळत नकळ्त जगला गेलाय तोच बहुधा आपल्याकडून आपोआप वदला जात असावा असे माझे मत मी बनवून घेतले आहे. तनवीर सिद्दिकीची कविता वाचताना त्यात अनुभवाच्या ऐरणीवर लालबुंद करुन ठोकलेली सामाजिक मानसिकता सिद्धांताच्या रुपात आपल्याला वाचायला मिळते. बघा ही कविता...
>>एक बी जिला हात लावला
ती म्हणाली मला वेल व्हायचंय
आधार दिल्यावर जेव्हा ती वेल झाली
तेव्हा म्हणाली मला झाड व्हायचंय
तिला कणा दिल्यावर ते झाड म्हणालं
मला तुम्हाला सावली द्यायचीय
त्या सावलीत बसून ज्या कविता लिहिल्या
त्या आता त्या झाडांना आवडत नाहीत..
मात्र पायापाशी एक अनाथ बी
ऐकत हसत असते
मला आता हात लावायची भीती वाटते
..कागदाला !
किंवा ही एक बघा...
>>एकेदिवशी स्वप्नात
समोर देव होता आणि त्याच्यासमोर मी
माझ्या हातात माझ्या जीवनाची वही होती
त्यात बेरीज होती, वजाबाकी होती
त्यात भागाकार होते, गुणाकार होते ..
देवाच्या हातात एक मूल होते
तो तिला विचारुन विचारुन पाणी पाजत होता
माझ्याकड़े हे नाही, ते नाही
मी रागात त्याच्याशी
बोलायला सुरवात करणार होतोच
की
तो हसत बोलला...
हिला ओळखतो ?
ही तुझी मोठी बहीण आहे वेड्या...
हिच्याकड़े 'जन्म' च नाही !
अलेले, गुड्डू, बघ तुझा भाऊ आलाय..
हा, तर तू काय बोलत होतास?
ऐनी प्रॉब्लम?
मुक्तछंदाला विशिष्ट लय असावी म्हणतात ....कोणती लय.. कशी लय...यावर मी या निष्कर्षावर आलोय की ही लय म्हणजेच आपल्या विचाराधीन मनाच्या आवर्तनांतून उत्पन्न होणारी कंपने. आता ही कंपने ओळखायची तरी कशी नेमकी? बहुतेक वेळा मुक्तछंदाच्या नावाखाली गद्य उतारे वाचून दाखवणारे लोक भेटतात आणि मग मुक्तछंदावर प्रश्नचिन्हे उभी राहू लागतात. मुक्तछंद जेव्हा मनाचे आवर्तन घेऊन बाहेर येतो तेव्हा कवितेच्या प्रत्येक ओळीत एक नादमय हुंकार जाणवतो. अशी कविता वाचताना अथवा ऐकतानासुद्धा फार प्रभावी वाटते.. कमालीची निरागसता आणि आशावाद दाखवणारी ही रचना बघा....रचना वाचताना मनात येते की कोणत्या मानसिक अवस्थेत संजय चौधरी सरांनी ही कविता सुचली असेल....असे कोणते चिंतन असेल ज्याने कवितेला एवढी प्रखरता आली असेल !!
>>मथुरेला गेलो
म्हटलं कृष्ण कुठं आहे ?
बोलवा जरा , सांगा भेटायला आलोय
तर उरलेले लोक म्हणाले
कृष्ण आता इथे रहात नाही
आता इथे बासरीचे सूर घुमत नाही
कृष्ण गेला
सोबत गोपी गेल्या
बासरी गेली गायी गेल्या
सोबत मथुराही गेली
आता यमुनेचं ते पाणी ही नाही
सगळं वाहून गेलंय
पण असं म्हणतात
जो भेटण्याची तहान घेऊन येतो
त्याला कान्हा भेटल्याशिवाय रहात नाही
घरी आलो
आरशात पाहिलं तर
चेहर्याच्या जागी मोरपीस......!!
कविता संपते तिथे आपण गोळा करुन ठेवलेल्या सर्व श्वासांना मोकळीक मिळते आणि आपोआप ओठावर(कुणाच्याही) स्मित तरळून जाते. हे स्मित म्हणजे प्रत्येकवेळी कवितेला मिळालेला पुरस्कारच नव्हे का !! खलील मोमीन सरांच्या तोंडपाठ झालेल्या शेकडो कविता धामणस्करांच्या आहेत. ज्या धामणस्करांनी लिखाणाला एक वेगळी उंची दिली. वास्तवाला समाजासमोर ठेवताना त्याला हळवेपणाचा साज चढवला आणि विश्वासाच्या कसोटीवर उतरलेले प्रेमसुद्धा व्यक्त केले... खाली तीन कवितांचे दाखले आहेत जे वाचल्या वाचल्या तुम्हाला धामणस्करांचे संग्रह वाचण्याचा मोह होईल.
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….(....)
**
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …(....)
**
प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.
मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,
उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखिल. मला
ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या
भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. (.....)
***
या आणि अशा अनेक रचना मुक्तछंदाच्या मांदियाळीत दिमाखाने उभ्या आहेत. आपल्यालाही आपली कविता या रांगेत उभी करायची असेल तर मुक्तछंदावर अन्याय न करता/ त्याला व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ देऊन / त्याला टाळ्या मिळवण्याचे साधन न मानता रांगत रांगत का होईना बाळसेदार होईपर्यंत सांभाळायला हवे...नारायण सुर्वेंची 'तुमचच नाव लिवा' किंवा कुसुमाग्रजांची " पाठीवरची थाप " म्हणा किंवा इंदिरा संतांची " सहज सहज टाकुन गेलास" असो प्रत्येक रचनेत त्यांनी आपल्या अंतर्मनाची निखळ आवर्तने भरली आहेत. आपणही आपल्या आत गुदमरणार्या मुक्तछंदाला हात देऊन मुक्ती देताना त्याच्या मुलभूत छंदाला जपण्याचा प्रयत्न करु या.....एक वाचकाच्या भुमिकेतून हा लेख लिहिलाय... भावनेच्या भरात काही चुकले असल्यास माफ कराल ही अपेक्षा (क्रमश:)
-- संतोष वाटपाडे



.jpeg)



