Thursday, September 1, 2016

माझा बाबा

माझा बाबा मांडीवरती वळता वळता दोरी
रटाळवाण्या एक दुपारी बसला होता दारी
समोर पसरवलेली होती जमीन काळी सारी
अंग जाळत्या उन्हात होती माती तळमळणारी....

खुरटे होते केस पांढरे त्याच्या दाढीवरती
दुरुन जाणवणारी थरथर होती मानेवरती
घाम निथळता अंगावरचा टोचत होता बहुधा
माशा भणभण करीत होत्या ओल्या डोक्यावरती...

मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही....

गुडघ्यावरती तळपायाला टिचरं भळभळणारी
तरीही डोळ्यामधे काळजी टपटप ओघळणारी
दिंडी गेली रित्या हाताने दारावरुन परतून
व्यथा मनाची हीच एकटी पुन्हा पुन्हा सलणारी.....

धोतर चिरले होते तेथुन चिंध्या लोंबत होत्या
उष्ण झळांच्या अधीर जळवा गाली झोंबत होत्या
बांधावरती नुसत्या फिरत्या गरीब काही शेळ्या
दारामधला बाबा पाहून उगाच थांबत होत्या....

परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता.....
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)

नांगराचा बैल मुका

नांगराचा बैल मुका त्याला लागलेली धाप
घाम डोळ्यात भरुन ढेकळात उभा बाप..

आई बाभळीच्या खाली काड्या येचून बसली
डोळे पुसून खपाट खोटं उगाच हसली
धनी उपाशी राबतो नाही उरली भाकर
खाली ढेकूळ ठेवला वर लोणच्याची खाप..
घाम डोळ्यात भरुन..

फाळ घुसला कण्हत फुटे वावराची छाती
चर बुजत चालला ढासळली पुन्हा माती
डोळे आभाळात दोन्ही पाय मातीत रोवले
बैल हंबरला काळा त्याच्या पाठीवर थाप..
घाम डोळ्यात भरुन..

जाड साबराला माझी झुले लुगड्याची झोळी
दिसे दुरुन आईची मला फ़ाटलेली चोळी
माझे रडणे ऐकून नाही येणार कुणीही
आलो घेऊन कपाळी देवा गरीबीचा शाप..

नांगराचा बैल मुका त्याला लागलेली धाप
घाम डोळ्यात भरुन ढेकळात उभा बाप..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

आधार ( मंदारमाला)

आधार मागावया दुःख माझे
उभे आज दारी पहा श्रीहरी,
कोठेच नाही असा भक्त वेडा
नको दूर जाऊ रहा मंदिरी.....
आक्रोश केला जरी फार वेळा
वृथा संकटे रोज आली घरी,
फ़ोडून टाहो तुझा जाप केला
अशी वेळ का आज माझ्यावरी.....

आयुष्य माझे गरीबीत गेले
तरी पंढरीला सदा धावलो,
शेतात आल्या किती टोळधाडी
उपाशीच होतो तरी हासलो.....
वाळून गेली पिके फ़ार वेळा
कधी पावसाने उभी जाळली,
बोलायला फार होते परंतू
मुके राहुनी आण मी पाळली.....

पोथ्या पुराणे उरी घेत आलो
हरीपाठ होता मुखी सर्वदा,
माळा गळ्यातील सांभाळल्या मी
जिभेला तडे पाडले खूपदा....
आबाळ झाली घराचीच देवा
कुणी धावले ना दशा पाहण्या,
तू सावली माऊली पांडुरंगा
हवा आसरा रे सुखी राहण्या.....

मी राबतो रोज मातीत माझ्या
हरीनाम श्वासात आहे तरी,
डोक्यावरी भार सार्‍या घराचा
कधी जाणवू ना दिले मी घरी...
गेल्या पिढ्या कैक कष्टात राया
तुझा दास व्याकूळ दारावरी,
सांगून झाली व्यथा सर्व माझी
अता न्याय द्यावा मला श्रीहरी,...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

प्रिये स्वप्न पाहू..

नको चांदण्याचे नको सागराचे
नको उंच माडी सुशोभित घराचे
प्रिये स्वप्न पाहू तुझ्या आवडीचे
नदीकाठच्या एकट्या झोपडीचे...

कधी गार वारा कधी ऊन येइल
कधी पावसाने चुडा चिंब होइल
सरी झेलताना भिजू धुंद होऊ
करु सोबतीने तळे ओंजळीचे...
प्रिये स्वप्न...

परसबाग छोटी घरे पाखरांची
उघडताच ताटी फ़ुले कर्दळीची
कधी झोपलो जर तुझ्या पायथ्याशी
मला छत मिळावे तुझ्या ओढणीचे ...
प्रिये स्वप्न..

जिथे चूल आहे तिथे दाट हिरवळ
सदा दरवळावा चुलीतून दरवळ
मला भूक नाही तरी वेड आहे
सुगंधी तुझ्या हातच्या भाकरीचे...
प्रिये स्वप्न...

तुझा हात हाती बसायास माती
नभाची रजाई उजेडास वाती
तरल गंध काही तुझे स्पर्श काही
कसे मोल सांगू प्रिये या सुखाचे....
प्रिये स्वप्न..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

वसंतातली मखमली पालवी

तू वसंतातली मखमली पालवी
गारवा गंध वारा उन्हासारखी
फूल तू पाकळीचा तरल गंधही
तू तृणातील कोमल दवासारखी..

रात्रभर चांदण्याचा जसा तू सडा
पौर्णिमेच्या दुधी चांदव्यासारखी
चुंबनांच्या खुणा तू मिठी तू नशा
तू उरी झोंबत्या गारव्यासारखी..

जाळतो स्पर्श ओठास जेव्हा तुझा
वाटते तू मला विस्तवासारखी
चिंब ओलावले वस्त्र तू भास तू
श्रावणातील तू पावसासारखी..

झाड तू पान तू सावळी सावली
तू नितळगार चंचल नदीसारखी
पार पिंपळ विटा केशरी शांतता
तू समाधी दिवा अर्चनेसारखी..

गाय गोठ्यातली अंगणीची तुळस
तू भुकेल्या खुळ्या वासरासारखी
तू जिव्हाळ्यातही तू शहार्‍यातही
स्पंदने.. श्वास.. तू काळजासारखी....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

सुगंधीत फ़ाया

सुगंधीत फाया नशा केवड्याची
कळी मोगर्‍याची असावीस तू
नवी कोवळी पालवी पिंपळाची
जणू हंसिणीचे मऊ पीस तू..

स्पृहा जाणिवा सावली स्पर्श माया
नभी थांबला सावळा मेघ तू
धरा अंबराचा जिथे वेध घेते
क्षितिज व्यापुनी तांबडी रेघ तू..

धुके ऊन वारा सरी पावसाच्या
मऊशार मातीतला गंध तू
पुन्हा सांजवेळी मिठी मारणारी
जशी पश्चिमेची हवा मंद तू..

कधी काढला देह माझ्यातुनी मी
उरावीस बाकी असा प्राण तू
प्रवासात चालायला जीवनाच्या
असावीस पायातले त्राण तू..

खुले देवघर दरवळावे पहाटे
निखारा धुमारे खडी धूप तू
कपाळी टिळा लावुनी चंदनाचा
उभे विठ्ठलाचे दिसे रुप तू..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

उध्वस्त घर

उध्वस्त घराचे दार उघडले आहे
घर कोसळल्याने छप्पर पडले आहे
आतला मेज फ़रशी माळा अन आढे
भिंतींचे ओझे घेऊन निजले आहे...

वड पिंपळ उंबर निंब उगवले काही
पालवी फुटे आधार मुळांना नाही
जे उभे स्वतः चिरकाल न राहू शकले
एकांताने पोखरले खांबांनाही...

आढ्याचे नारळ फ़डक्यामध्ये आहे
मुंडके घराचे गुडघ्यांमध्ये आहे
घर रडते आहे कुणी पाहिले नाही
भुतकाळ कोरडा डोळ्यांमध्ये आहे..

अंगणी उंबरा आला आहे सरकुन
चौकटी किड्यांनी पोकळ केल्या आतुन
या भग्न घरी वावर कोणाचा आहे
जे पाय धुळीवर नकळ्त गेले टाकुन...

आजकाल मन घरट्यागत माझे दिसते
मी डोळे मिटल्यावर ते मजला हसते
सांधण्या घराला मदत कुणाची घेऊ
माझ्या अवतीभवती कोणीही नसते....

-- संतोष

ही बाग कुणाची आहे

ही हिरवी हिरवी झाडे
हे निळेजांभळे डोंगर
या गोजिरवाण्या वेली
अविरत पक्षांचा वावर
वारा भिरभिरला तेथे
गवताची होते थरथर
कुरणातून नकळत येते
ती साद कुणाची आहे....ही बाग कुणाची आहे..

डोकवला हळूच दिनकर
जागवून डोंगरमाथे
घरघरले धरतीवरती
तांबूस पिठाचे जाते
पसरून कोवळी किरणे
नभ रंगून उत्कट होते
सावलीस गहिवरलेल्या
जरतार उन्हाची आहे...ही बाग कुणाची आहे

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहे...ही बाग कुणाची आहे

निजताच रवी घरट्याशी
चंदेरी दिसते अंबर
खोचली फ़ुले लखलखती
अभ्रांची अद्भुत चादर
प्राजक्त अंगणी जिच्या
झोपडी असावी सुंदर
अंगणात अंथरलेली
ती खाट कुणाची आहे....ही बाग कुणाची आहे
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

तत्व

तत्व मिसळले तत्वामध्ये
देह अजुनही घेतो श्वास
विरले नाही वस्त्र एकही
झडत चालले सारे मांस

जाळ पेटला उंच उसळला
पोटामाजी विझली आग
डोक्याखाली हात ठेवला
डोईवरती काळा नाग...

तडतड वाजत फ़ुटले काही
तगमग वैफ़ल्याची आत
खडकावर पांगला दमाने
मडक्यातुन शिजलेला भात

हातपाय बांधले कधीचे
छातीवर नात्यांची माळ
गर्दी भवती हसते रडते
मृदुंग अन छनछनतो टाळ...

-- संतोष

Saturday, August 2, 2014

प्राजक्त...

...प्राजक्त...

प्राजक्त पहाटे फ़ुलतो
वार्‍यात असा दरवळतो
पांढरा सडा थेंबांचा
अंगणात माझ्या दिसतो..

तांबडे देठ पानेरी
पानांची किलबिल दारी
अन फ़ुले बरसती जेव्हा
गालात जरासा हसतो...

आभाळी कृष्ण ढगांची
जमलेली दिसते गर्दी
पेलून फ़ुलांना सार्‍या
प्राजक्त तसा गजबजतो...

मृदगंध पसरतो रानी
मल्हार गरजतो कानी
मातीवर टपटप ऐसा
आवाज फ़ुलांचा असतो...

पाझरते चिंब सरींनी
दारातील सारी माती
प्राजक्त झर्‍यागत अवखळ
अंगणात सार्‍या पळतो...

या धुंद पहाटे माझ्या
अंगावर काटा फ़ुलतो
बघताना वाटत असते
पाऊस कधीचा पडतो
पाऊस कधीचा पडतो......

-- संतोष वाटपाडे (नाशिक)