Tuesday, August 21, 2018

गोविंद नाईक आणि गजल

आभाळाच्या दिशेन बोट करुन ठणकावून गजलेचा शेर ऐकवणारा आपला गजलकार मित्र आहे जो उत्तम चित्रकारही आहे. नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..

नुकतीच जन्मलेली आहेत पाखरे ती
इतक्यात काय सांगू..आकाश काय असते..?

यातून त्याने नवोदितांना काही इशारा दिलाय  जणू !! परिपक्वता पुस्तकातून, वाचनातून अथवा श्रवणातून येत नसते....प्रत्येक लोखंडाला अनुभवाच्या भट्टीतून जाणे गरजेचे असते. त्यासाठी हवा फक्त संयम आणि संयम आहे म्हणूनच शेरात परिपुर्ण आशावाद जाणवतो.

एवढी का गढुळ झाली आसवें ही ?
टाकला कोणी खडा स्वप्नात माझ्या ?
****
विश्वासाने बोट कुणाला द्यावे धरण्यासाठी
जो तो इकडे टपून आहे हात छाटण्यासाठी..
****
छापले जातील सोयीस्कर उद्या काही रकाने
चालली आहे गुन्ह्याची चौकशी संगनमताने..

वरील सर्व शेरांमधे त्याच्या स्वभावाचे पैलू स्पष्ट होत आहेत. आपल्या आत जो त्रयस्थ बसलेला असतो त्याच्या नजरेतून बघणेही जमायला हवे. तरच गजलेच्या प्रत्येक शेरात आपण असामान्य आशय भरु शकतो.

एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान चित्रकार आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता/गजल चांगली अथवा वाईट कधीही नसते. एकतर ती असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला.

खरं तर मनातून आवेगात आलेला भावनांचा पूर कुठल्या फुटपट्टीने मोजायचा नसतो. आपल्या आतील कलेतून मुक्तपणे व्यक्त होणे हाच कवीचा मुळ स्वभाव असावा. कविता निर्मिती ही फार वेगळी प्रक्रिया आहे. आपल्या वेदना-संवेदना आणि चिंतन यांच्या मंथनातून बाहेर येणार सुंदर रत्न म्हणजे कविता. जशा प्रकारचे मंथन असणार तशाप्रकारची निर्मिती असणार आहे. मंथनातून अमृतही बाहेर पडेल ,विषही येईल तशा अनेक दिव्य गोष्टीही हातात येणार आहेत. हे मंथन करताना मात्र आपल्या अंतर्मनात परिणामांची जाणीव आधीपासून ठेवायला हवीय.

कविता/गजल कशी तयार होते, कशी लिहावी याचे काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. त्यामुळेच त्यांची व्याख्या करणंही अगदी कठीण आहे. आपल्या पुर्वजांनी साहित्यात जे काही लिहून ठेवलेय त्याच्या आधारे आपण काही विशिष्ट निष्कर्ष अथवा ठोकताळे बनवून घेतले आहेत. हे लिखाण आपल्याला अनेक प्रकारे मार्गदर्शनही करते मात्र त्याच लिखाणाला प्रमाण मानुन आपली दिशा ठरवणे हेही चांगले नाही. पुर्वजांनी आपल्यासाठी शिडी बनवून दिलीय जेणेकरुन उंच शिखरावर आपल्याला पोहोचता येईल. पण सतत त्या शिडीचा वापर करणे किंवा इतरांनाही तेच सांगणे म्हणजे अतिरेक ठरेल. अशा कृतीने आपली मुळ सृजनशक्ती चेंगरली जाऊ शकते.

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार  केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

कोणतेही वृत्तबद्ध लेखण आपल्या वृत्तीतूनच परावर्तित होत असते. गोविंद नाईक हा माणूस सडेतोड स्वभावाचा , कुणाचीही बुराई न करणारा आणि वाईटात वाईट परिस्थितीतून मार्ग काढत चेहर्‍यावर हसू ठेवणारा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक कवितेतून अथवा शेरातून त्याच्या स्वभावगुणांचे प्रतिबिंब दिसून येते. कला हे व्यक्त होण्याचे साधन आहे त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या प्रकृतीनुसार आणि प्रकृतीने निवडलेल्या कलेनुसार व्यक्त होत असतो. कुणाला सामाजिक जाणिवांवर भाष्य करावे वाटते तर कुणाला निसर्गावर लिहावे वाटते. कुणाला केवळ नातेसंबंधांवर लिहावे वाटते तर कुणाला प्रणयाराधना आवडते. आपल्या प्रकृतीला वगळून काही लिहायचा प्रयत्न केलाही तरी ते लिखाण वाचकाच्या मनात खोलवर शिरू शकत नाही किंबहुना आपल्याला स्वतःलाच ते रुचत नाही.

गरज नसली तरीही चालण्याची हाव सुटते
खुळ्या नादात शहराच्या सुखाचे गाव सुटते

जिथे फिरतात चकव्यासारख्या अंधारवाटा
तिथे अफवा उजेडाची किती भरधाव सुटते

असले विचार केवळ संवेदनशील मनातूनच बाहेर येऊ शकतात. भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मोजक्या शब्दात बरेच काही सुचवण्याचा प्रयत्न केलाय. आपण फक्त आपल्या जीवनाशी या शेरांची सांगड घालून बघायला पाहिजे. आपल्या कलेचा योग्य वापर आणि अनुभवांनी शिकवलेले धडे सुत्रात टाकून समाजासमोर ठेवताना हे लिखाण काळाच्या कसोटीवर घासले जाणार आणि खरे उतरणार आहे असा त्यांना ठाम विश्वास आहे....असायलाच हवा ! कारण हे केवळ वैयक्तिक विचार नाहीत. हे विचारप्रवाह आहेत जे आपल्या आजुबाजुला वाहत असतात आणि आपल्याला जगण्याचे भान शिकवत असतात.

मुद्दा हा आहे कि वृत्तबद्ध लेखन आपल्या प्रकृतीच्या मंथनातूनच शक्य होते. बारकाईने प्रत्येक कवी/गजलकाराच्या लिखाणाकडे पाहिले तर प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. तसं बघायला गेलं तर मात्रासंख्या,सुत्रे,लगावली सर्वांच्याच पाठ असतात . कवितेला/गजलेला नेमकं काय हवे हेही माहित असते. फरक असतो फक्त अंमलबाजवणीत. आपल्या मनातील विचारांना(खयाल) कशा पद्धतीने मांडल्यावर वाचकाच्या काळजाचा वेध घेता येईल याची मिमांसा जो करु शकतो तोच वृत्तबद्ध लिखाणाचा आनंद घेऊ शकतो. अनेक समिक्षणे एवढ्यात वाचायला मिळालीत ज्यात नवोदित गजलकार/कवींवर खुलेआम टिका केल्याचे आढळते. संख्यात्मक वाढ वगैरे विधाने जेव्हा केली जातात तेव्हा हा विचारही केला जावा कि विचारांची परिपक्वता प्रत्येक पिढीत सारखीच नसणार/नसेल. त्यामुळे मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या परिपक्वतेवर बोट ठेवण्यापेक्षा कालानुरुप होणारे बदल स्विकारायला हवेत.

गोविंदरावांची ही गजल माझ्या बहुतेक मुद्द्यांना स्पष्ट करणारी आहे....

मोहातुन सगळ्या वाट काढली आहे
मी तुला दिलेली वेळ पाळली आहे

जो दिवस उजाडत आहे त्यावर बोलू
कालची रात्र केव्हाच संपली आहे

मी जवळपासही माझ्या फिरकत नाही
मी मला स्वतःची भिती घातली आहे

फिरताना हल्ली त्रास उन्हाला होतो
जिकडे तिकडे सावली सांडली आहे

हे आयुष्याचे कुचकामी गाठोडे
जगण्याची आशा फक्त कोंबली आहे

ह्या तलवारीचा घाव खोलवर होइल
ह्या तलवारीची मूठ चांगली आहे

झुकतील पापण्या आता सूर्याच्याही
मी आकाशावर झेप रोखली आहे

मी मंथनात कुठल्याही सामिल नाही
मी फक्त विषावर नजर ठेवली आहे

गोविंद....

प्रकृतीला हात घालण्याचे कसब त्यांना खुप छान रितीने जमले आहे. त्यांच्या लिखाणावर चिंतन केले तर नवोदितांना लिखाणात नक्कीच योग्य मार्ग मिळेल.

मला स्वतःला पारंपारिक वृत्तबद्ध कविता लिहायला आवडते कारण मला त्यातून आनंद मिळतो. वर्तमानावर भाष्य करताना शब्दांशी सख्य करणे मला जमत नसावे कदाचित. म्हणून मी आधुनिकतेवर भाष्य करणार्‍या नवोदित कवींना कमी लेखायला नकोय. प्रत्येकाचा वेगळा पिंड असतो ज्याला आपण प्रकृति म्हणू या. महत्व हवे आकृतीबंधाला. व्याकरणाचे शस्त्र हातात घेऊन वृत्तबद्ध लेखनाची सुंदर लेणी कोरणे हेच आपले मुळ उद्दिष्ट असावे असे मला वाटते.( हे विधान वृत्तबद्ध ज्यांना वृत्तबद्ध लिखाण करायचे आहे त्यांच्यासाठी आहे ) बाकी दिवसाला हजारो कविता आपल्या मराठी साहित्याला सोडल्या जातीत. कालप्रवाहात काय काय टिकते/टिकेल याचा अंदाज आपण आतापासून घेतला तर पुढील लिखाणात सोयीस्कर पावले उचलता येतील. जाता जाता गोविंदरावांचा शेर लिहावा वाटतोय....

चक्रव्यूहाची स्वताच्या कल्पना येते कुठे
मग स्वताला भेदण्यातच संपते आयुष्य हे

चक्रव्युहात सापडण्यापुर्वीच बाहेर बाहेर पडण्याचा मार्गही शोधून ठेवा......( क्रमश:) ( चु भू दे घे )

-- संतोष वाटपाडे

कमलाकर देसले आबा - एक चिंतनशील कवी

आपण मागच्या लेखात व्यक्तिची प्रकृती आणि तिच्या रचना यांचा मेळ कसा असावा यावर प्रकाशझोत टाकला. फ़ेसबुकात अनेक वर्तुळे आहेत ज्यांचा परिघ ५००० मित्रांचा आहे. आपण नजरेत येईल तेवढे वाचतो आणि काही आवडीचे कवी असतील तर त्यांच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या रचना वाचतो. असेच एक वर्तुळ आपलेही आहे, ज्यात अनेक दिग्गज साहित्यिक/कवी/लेखक/गायक,संगीतकार आणि चित्रकारही आहेत. त्यातलाच एक मित्रांना मित्र मानणारा आणि शत्रूंनाही मित्र मानणारा, मायाळूपणाच्या बाबतीत खुद्द आभाळाला लाजवणारा, मानेवर सर्रकन सुरा फ़िरवल्यागत शेर कानावर फ़िरवणारा, आपल्या वारकरी संप्रदायातून शब्दांची वारी पंढरीच्या वाटेवर रोज अव्याहतपणे नेणारा गजलकार मित्र आहे .

नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..होय आबा !! कमलाकर आत्माराम देसले......हे नाव घेतले की वलयातल्या प्रत्येक साहित्यिकाच्या डोळ्यात आपोआप आदराचे भाव निर्माण होतात. यामागचे एकमेव कारण आहे आबांची समावेशकता. खेड्यातील रहिवास,सुसंस्कारी देसले परीवार आणि भक्तीमार्गाचा अवलंब या गोष्टींमुळे आबांच्या लिखाणाची दिशा फ़ार वेगळी आहे. आता आपण बघू या प्रकृती !

आबांशी बोलणे म्हणजे सत्संग ..मी अगदी ठाम आहे विधानावर ! आजवर आबांशी जितक्या काही चर्चा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाल्या आहेत त्यातुन मी घेतलेले ज्ञान म्हणजे हा लेख असे म्हणता येईल .चुकूनही कुणाचे मन न दुखावणारे आबा आपल्या लेखनातून कसे व्यक्त होताना काळ अगदी सावध असतात. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की "कागदाचे पावित्र्य आपल्या लेखनाने नष्ट व्हायला नको." आपल्या लिखाणातून प्रेरक उर्जाच मिळावी असा निशचय करुन जणू ते लिहित असावेत. नुसतेच प्रासादिक,नुसतेच मार्मिक अथवा नुसतेच सैद्धांतिक लिखाण नाही त्यांचे...गजलेत स्वतःची प्रकृती ओळखून तिच्याशी निगडीत केलेली आयुष्याविषयीची/अनुभवांविषयीची साधी भाष्ये म्हणता येतील असे शेर आहेत त्यांचे...

अंकुराला दगड सुद्धा चालतो
जीवनाला फक्त संधी पाहिजे ..
***
इस्त्री फिरली दु:खाची दिनरात अशी, की -
आयुष्याचा कपडा अवघा सुंदर झाला ...
***
ही न शर्त , की गळ्यात गोडवा हवा
आतल्या स्वरात गुणगुणायला हवे..

हा आतला स्वर म्हणजेच आपली प्रकृती... एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान शिक्षक आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता चांगली अथवा वाईट कधीही नसते. कविता एकतर असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला. पण डोळे जिथे थबकतात तिथे नक्कीच आपल्या अपेक्षेशी/विचारांशी सुसंगत काहीतरी असते म्हणूनच आपण ती रचना वाचतो. आबांच्या लिखाणावर जीव जडण्याचे एकमेव कारण आहे साधेपणा. हा साधेपणा त्यांच्या प्रकृतीतून आलाय यावर नक्कीच कुणाचे दुमत नसणार !

खरं तर मनातून आवेगात आलेल्या भावनांच्या महापूराला कुठल्या परिमाणाने मोजायचा नसते. मुक्तपणे व्यक्त होणं हाच कवीचा स्वभाव; मात्र कविता निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे. वेदना- जाणिवा संवेदना त्याचसोबत आणि चिंतनाच्या मंथनातून कलाकुसर करुन विणलेले वस्त्र म्हणजे म्हणजे कविता होय. जेवढे तीव्र मंथन असणार तेवढे जास्त लोणी मिळणार . आबांच्या कविता/लेख/गजला काहीही वाचले की आपोआप "वाह्ह्ह्ह येते" ही वाहवा त्यांच्याव्यक्तित्वाशी संबंधित नसून त्यांच्या चिंतनाचा आपल्यावर होणारा परिणाम असतो ! दाखल्यासाठी हे शेर देता येतील...

कुठून येते पक्षांमध्ये तारतम्य हे ;
तुळशीवरती कधी कावळा बसला नाही ...
***
कल्पनेने तुला घामही यायचा ;
तू नितीमान होतास रे रावणा ...
***
खूप झाली अरे पुस्तके वाचुनी ;
जीवनाला जरा चाळले पाहिजे ...

प्रयोगशीलता आणि वैविध्य या दोन गोष्टीं समोर ठेवून लिखाण करत राहिल्यास वाचकाला मिळेल/ न मिळेल त्यापेक्षा जास्त आनंद आपल्या स्वतःला मिळवता येऊ शकतो. लेखकाची नजर चौफ़ेर फिरली पाहिजे जेणेकरुन त्या नजरेला निसर्गातले सर्व रस टिपता यायला हवे. कमलाकर आबांचे वाचन अफ़ाट आहे तरीही आबांनी अमुक एक कवीसारखे लिहा/लिहिले पाहिजे असे कधी म्हटले नाही कारण त्यांना स्वतःलाच एका विशिष्ट चाकोरीत लिहायला आवडत नाही.

त्यांचा दांडगा अभ्यास,छंदावर असलेला हातखंडा आणि त्यांची प्रयोगशीलता यातून निर्माण झालेली काव्यही आजन्म स्मरणात रहावीत अशी आहेत. सुंदर हस्ताक्षर,गोड गळा,संगीताची जाण, वाक:सिद्धी, लेखणीवरील संयमीत ताबा या गुणांचे मिश्रण स्मरणात रहावी म्हणून तर गेय काव्यांची निर्मिती झालीय. आजवर प्राचीन काळात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ गेय स्वरुपातच तर आहेत  ! त्यावेळी गद्य लेखन / दैनंदिन व्यवहारातल्या संवादाची भाषा अस्तित्वात असेलही तरीसुद्धा गेयतेकडे विशेष लक्ष दिले गेलेय. यातून एक शिकवण आपण नक्कीच घ्यायला हवी की वृत्तबद्ध/लयबद्ध लिखाण हे चिरकाल स्मरणात राहण्यास सोपे जाते आणि मनाला आनंदही देते. आबांची ही त्यातलीच एक कविता बघा....

पाऱ्यासम हातोहाती
सुख हळूच निसटुन जाते
सावलीसारखे साथी
हे दु:ख सोबती येते

वेश्येला कसले नाते,
भोगाला घेते भोगी
आवेग संपता उरतो
मग रितेपणाचा रोगी
मग कुरुप असली तरीही
पतिव्रताच पदरी घेते ..
सावली सारखे..

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

काही लोक यातून वेगळा अर्थ काढू शकतील ..की तंत्र शिकायलाच नको! आम्हाला नैसर्गिकरित्या,उन्मळून आलेली,प्रवाहित झालेली( वगैरे वगैरे) कविताच आवडते. पण अशा विधानांखाली दडून लिहिल्याने कुपोषित काव्ये जन्माला येऊ शकतात. माझ्या लिखाणावर वृत्तांचा संपुर्णपणे पगडा आहे हे मी मान्य करतो मात्र त्याचवेळी उत्कृष्ट मुक्तछंदांवर सुद्धा मनापासून प्रेम करतो आणि तसले मुक्तछंद मलाही लिहिता यावेत याचाही प्रयत्न करतो. मुद्दा हा आहे की तो मुक्तछंद माझ्या प्रकृतीचे प्रतिबिंब असावा. मुक्तछंदालाही एक विशिष्ट लय असते हे मी फ़क्त ऐकून आहे. ती लय नेमकी कशी ओळखावी हे मात्र मलाही माहिती नाही. त्यामुळे मला जो मुक्तछंद मनापासून आवडला तो नक्की लयीत असावा असा समज मी माझ्यापुरता करुन घेतो. मुक्तछंदात लिहिताना आबा वाचकाच्या काळजात हात घालतात...कसा ते बघा

सर्वांना दिसतात
तसेच दिसताहेत मलाही तुझे डोळे
पण सर्वांना दिसत नाहीत
ते विभ्रम पाहतो आहे मी तुझ्या डोळ्यात..
तुला माझी गझल ऐकतांना
गझल झलेली पाहतो मी

एखाद्या पट्टीच्या गायकाने
घ्याव्यात काही खास जागा
एकाच गाण्यात
तसा तुझा गाण्यासारखा चेहरा
तुझ्या साध्याच चेहऱ्यावर
उमटताहेत तशा काही जागा
फक्त जागांसाठी पुन्हा पुन्हा ऐकावे
तेच ते गाणे
तसा पाहतोय मी तुझा चेहरा
गाणे झालेला ..

तशी तू अगदीच वेगळी नाहीस
पण तू आहेसच वेगळी
भोवतीच्या गद्य चेहऱ्यात
उमटून दिसणाऱ्या
लोभस कवितेसारखी...

चांगल्या कवीला वाचकांची नस पकडता आली पाहिजे. आपल्यावर झालेल्या संस्कारांनुसार आपण शब्दांची निवड करतो. इशकृपेने तुम्ही-आम्ही अत्यंत समृद्ध भाषेच्या पोटी जन्म घेतला आहे. आपल्या भाषेत लिहिली गेलेली अनेक पुस्तके आहेत जी वाचली तरी येणार्याा हजार जन्मांचे सार्थक होऊ शकेल. मराठी भाषा भावनांच्या आवर्तनांना जसेच्या तसे मांडू शकते. आपली भाषा आपल्याला  आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची संधी देते. आबांची वृत्तबद्ध कविता वाचताना मनाचे संपुर्ण समाधान होते कारण त्यांची शब्दांची निवड आपल्या तृष्णेच्या जवळपास असते. ही कविता बघा..

सूर्याचा गोंदून जाळ , अंग आभाळ
तापतो माळ , उभ्या देहाचा
ये शामल संध्याकाळ , बांधुनी चाळ
वाजवित टाळ, तमाची वाचा

नावाला दोघे दोन, एकची प्राण
कुणाचे कोण , निरर्थक चर्चा
प्रेमाचे एकच गान, विलंबित तान
श्रुतीचा कान, सूर हा वरचा

असाधारण चिंतनातून आलेला एकेक शब्द काळजाला स्पर्श करतो. याचसाठी आपण आपल्या प्रकृतिला ओळखून त्यानंतर विषय निवडावेत आणि लिखाण करावे . आपल्या मित्रयादीत अमुक एकजण लिहितोय आणि प्रसिद्धी मिळवतोय म्हणून आपणही आता लिहिले पाहिजे या अट्टहासाने नैराश्य पदरी पडते. आपण कवितेकडे धावत जाण्यापेक्षा तिला आपल्याकडे येऊ द्यावे. स्पर्धा करत राहिलो तर थकवा येईल आणि आत्मानंदापासून आपण हळूहळू दूर जाऊ.

--- संतोष वाटपाडे

चंद्रशेखर सानेकर आणि संयतशील लिखाण

एखादी रचना वृत्तात लिहिली...काफ़िये,रदीफ़,अलामत वगैरेंचे नियम पाळले..म्हणून आपली रचना गजल/वृत्तबद्ध कविता बनणार नाही........

त्यासाठी लागते आपली पारदर्शकता... बहुतेकांचा गैरसमज आहे की वृत्त पाळणे म्हणजे "लगावली" पाळणे असते... वृत्तबद्ध लिखाण का करावे यामागचे कारण जाणणे खूप आवश्यक आहे. केवळ फ़ेसबुकात सर्व लोक वृत्तबद्ध कविता/गजल लिहित आहेत म्हणून किंवा प्रचंड वाहवा/तारीफ़ पदरात मिळते म्हणून वृत्तबद्ध लिखाण करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर ते आपल्याला शक्य होणार नाही. आपल्या प्रकृतीला हात घालून जेव्हा आपण सर्वमान्य व्याकरणाच्या आधाराने काही मांडू तेव्हा खरी वृत्तबद्ध रचना बाहेर आणि निखळ आनंदाची अनुभूती आपल्याला मिळणार आहे. प्रकृती ही काय भानगड आहे, हे आपल्या अवतीभवती असलेल्या गजलकारांच्या लिखाणाचा नीट अभ्यास केला तर हळूहळू आपल्याला कळू लागेल.

प्रकृती म्हणजे केवळ शारिरीक नव्हे किंवा आपली वागणूक नव्हे,प्रकृती म्हणजे केवळ चांगलेपणा नव्हे किंवा प्रकृती म्हणजे  केवळ उच्चविचार/गाढा अभ्यास/सखोल लेखन नव्हे.... सर्वसाधारणत: प्रकृती म्हणजे मनाचा विशिष्ट कल आहे. ज्यामधून व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचे परिस्थितीचे विश्लेषण करीत असते व त्याआधारे त्या व्यक्तीबद्दल अथवा परिस्थितीबद्दल चांगले किंवा वाईट ग्रह बनत असतात व त्यावर आधारित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची अथवा परिस्थितीबद्दलची आपल्या स्मृतीतील सारांश व त्याबद्दलचे आपण करत असलेले ग्रह यांच्यातील दुवा म्हणजे देखील प्रकृती होय.

सोप्या भाषेत सांगायचे तर पॉजिटिव्ह अथवा निगेटिव्ह भावना निर्माण करण्याची ताकद/कला व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. बाकी सर्व सोडून देऊ आणि हे बघू की आपली प्रकृती आणि त्यानुसार आपल्या मनाने घेतलेला निर्णय हा आरसा असतो आपल्या निरिक्षणाचा. यावरून प्रकृती म्हणजे एक प्रकारे विविध गोष्टींचे/ व्यक्तींचे केलेले मूल्यमापन असते, असे आपण म्हणू शकतो. एखादा सामाजिक/सांस्कृतिक मुद्दा, वस्तू अथवा व्यक्ती हे आवडणे अथवा न आवडणे हे काही प्रमाणात व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. आपली मुळ आवडनिवड,मुळ स्वभाव,मुळ कल यांच्या आधाराने आपण जेव्हा लिखाण करुन लागतो तेव्हा आपल्याला अमाप/अमर्याद/अतुलनीय आनंद मिळतो. खरं तर याच आनंदासाठी आपण लिखाण करायला हवंय. . इतर कुणाला मिळो अथवा ना मिळो पण स्वतःला मात्र हा अनुभव यायलाच हवा आणि हेच लिखाण जेव्हा वाचकाच्या मुळ प्रकृतीला,मुळ स्वभावाला हात घालते/स्पर्श करते तेव्हा तोच आनंद वाचकाच्या मनातही ट्रान्सफ़र होतो. आणि त्यामुळेच लेखक आणि वाचक यांच्यात एक गूढ अशी बांधिलकी निर्माण होते. आता हेच बघा की ...गायक गातो,चित्रकार चित्र काढतो,वादक वाजवतो तसेच लेखक लिहितो.....यातून दर्शकांचे/प्रेक्षकांचे/श्रोत्यांचे मनोरंजन होते हा भाग दूरचा...त्या सर्वांना अगोदर आपल्या कलेतुन आनंद मिळतो आणि नंतर हा आनंद आपोआप त्यांच्या कलाकृतीतून इतरांमधे पसरला जातो.

वर हे रामायण लिहिण्यामागचे प्रयोजन काय !!(?) ते सांगतो आता....प्रकृती अभ्यासण्यासाठी (मी वाचलेले) काही कवी/गजलकार आपण अभ्यासू.... हे सर्वजण आपल्या विशिष्ट प्रकृतीमुळे लोकप्रिय आहेत... आणि नीट बघाल तर जाणवेल की या प्रत्येकाची वृत्त निवडण्याची एक वेगळीच खासियत आहे....वरवर पाहिले तर सगळेचजण सगळीच वृत्ते हाताळतात,मान्य आहे...तरीसुद्धा माणूस आपल्या विचारांच्या प्रवाहाप्रमाणे वृत्ते निवडतो हेही लक्षात येते...चंद्रशेखर सानेकर हे एक आदरणीय नाव.... प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन ,आयुष्याचा/माणसांचा/परिस्थितींचा अनुभव आणि सोबतच स्विकारलेली जबाबदारी.....जबाबदारी फ़ार महत्वाचा शब्द आहे इथे...कविता ही जबाबदारी आहे....जशी लेकीची जबाबदारी आईवर असते तशीच !!! सानेकर सर अत्यंत जबाबदारीने एकेक शेर लिहितात....त्या प्रत्येक शेरातून त्यांची जबाबदार/ठाम आणि चौकस प्रकृती दिसते...मित्रांनो हा लेख मी कवी/गजलकारांच्या कौतुकासाठी लिहित नाहीये....मला दाखवायचेय की आपली प्रकृती आपल्या लिखाणावर कसे संस्कार करते.... सानेकर सरांचा हा शेर बघा !! केवढा ठामपणा आहे त्यांच्यात...

>>सवाल माझा हा नाही की हिरे विकू की खडे विकू
सवाल माझा हा आहे की पारख आहे कोणाला ?
~सानेकर

ठामपणा म्हणजे सिद्धांत असतात आणि असले सिद्धांत केवळ हजारो प्रयोगानंतरचे फलित असते... संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आणि इतर संतमंडळींनी आजन्म केलेल्या मनस्वी हरिनामातून तयार होणार्‍या उर्जेला तसेच चिंतनाला शब्दात मांडले म्हणूनच त्यांचे लिखाण प्रत्येक मनावर प्रभाव पाडू शकतेय.... व्यक्ति म्हणून लिखाण न बघता व्यक्तिचे आचार विचार बघून लिखाण वाचले की आपोआप गोडी निर्माण होते.. चंद्रशेखर सानेकर ही व्यक्ति जितकी खोडकर,लहरी,मनमिळाऊ,प्रेमळ आहे तितकीच साधक सुद्धा आहे...असा साधक जो तपश्चर्येच्या मार्गाने आपल्या आतल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आणि ही प्रश्नोत्तरे कवितेच्या/गजलेच्या रुपात वाचकांसमोर मांडतो... ते लिहितात...

>>तोवरी आपापल्या तंद्रीत भटकू सारखे
भेटलो तर भेटूया की धूमकेतूसारखे...

माणसाची भूक पाहुन देव थकुनी बोलला
" खायला इतके तुला कोठून आणू सारखे "

हे अता माझ्या उरावर फूल फुलले कोणते ?
ते तुझ्या हातात होते काय चाकूसारखे ?

वरचे तीनही शेर अगदी वेगवेगळे आहेत पण त्यांचा मुळ गाभा निश्चयात्म्क आहे.....तो सहज बनलेला नाहीये....जमीन खयाल वगैरे वगैरे मला कळत नाही...मला दिसतो त्या व्यक्तिचा दृष्टिकोन..त्याची प्रकृती...!!

जिकडे तिकडे कोसळताना बघतो माझी धडपड मी
पानगळीच्या दिवसांबद्दल करू कशाला ओरड मी !

तुझ्या सहज रेषेतच माझे सोपेपण दडले आहे
तुला जेवढा दिसतो आहे तितका नाही अवघड मी

हे शेर म्हणजे प्रमाण आहेत त्यांच्या चिंतनाचे असे मला वाटते !! वाचतानाच कळेल की मुळ तत्वज्ञानाला त्यांनी त्यांच्या प्रकृतीवर घासून बाहेर आणलेय....  फांदीवर आलेले पान हे एक न एक दिवस गळुन पडणार आहे ही खंत वैश्विक असताना मी पानगळीच्या दिवसांबद्दल का ओरड करावी?? एवढीशी गोष्ट शेरात मांडली तर त्यात काय विशेष??? असे ज्याला वाटेल त्याला गजल/प्रकृती कळलीच नाही असे म्हणावे लागेल.... आदरणीय सुरेश भटांनी सांगितले होते की मराठी कवितेत/गजलेत समाजपरिवर्तनाची ताकद असायला हवी...मराठी कवितेने/गजलेने प्रबोधन, प्रशिक्षण दिले तरच ती मनामनात उतरेल....म्हणूनच माझ्या नजरेतील काही कवी/गजलकारांच्या रचना वाचताना मी शोधतो की याने ही रचना कोणत्या मानसिक अवस्थेत आणि कोणते ध्येय समोर ठेवून लिहिली असेल.... बघा हे शेर....
---------------------------------

" कुठल्या मातीची आहे रे गझल तुझी ! "
" समजत नाही कशी घ्यायची दखल तुझी ! "

काय तिची ताकद आहे ती समजुन घे !
पृथ्वी ओढत घेउन जाइल गझल तुझी !

~चंद्रशेखर सानेकर

मी जे काही इथे लिहितोय हे माझ्या नजरेतून लिहितोय...मला कळलेले कवी/गजलकार याच दृष्टिकोनातून लिहितोय त्यामुळे हे प्रमाण वगैरे आहे असे मी म्हणत नाही.... पण प्रत्येक अभ्यासू/जिज्ञासू व्यक्तिची प्रकृती त्याच्या लिखाणातून डोकावते हे मात्र ठाम मत आहे... कविता/गजल यांचे व्याकरणातील नियम समजले तरी नुकताच काव्यक्षेत्रात प्रवेश करणार्‍यांनी आपल्या प्रकृती तपासायला हव्यात.... आणि वृत्तांचा/वृत्तींचा/प्रकृतींचा/कवितांचा/गजलांचा खरोखर अभ्यास करायचा असेल तर कमलाकर देसले आबा , खलिल मोमीन सर ,Bhushan Katakkar , Sadanand Gopal Bendre अप्पा, Shubhanan Chinchkar, Tushar Seema, सतिश दराडे, रणजित पराडकर , देवेंद्र गाडेकर, Sanjay Chaudhari, गोविंद नाईक ,क्रांती सडेकर,ममता सिंधुताई,  अमेय पंडीत, सुधीर मुळीक( नावे उदाहरणासाठी दिलीत केवळ) यासारख्या चिंतनशील लोकांच्या रचनांचा अभ्यास करणे गरजेचे आहे....या विषयावर हा माझा पहिलाच लेख आहे....प्रत्येक लेखात वेगळ्या प्रकृतीचा एक वेगळा कवी/गजलकार वाचकांसमोर मांडावा अशी माझी इच्छा आहे....या लिखाणात काही तृटी अथवा आक्षेपार्ह विधान आढळल्यास माझा नवशिकेपणा समजून मोठ्या मनाने माफ़ कराल ही अपेक्षा...

-- संतोष वाटपाडे ( नाशिक )