Saturday, September 3, 2016

अंधार

हा सूर्य उगवला आहे की जाळ पेटला आहे
तो कोण नभाच्या दारी येऊन ठेपला आहे
दारास देऊनी धडका मारतो कुणाला हाका
कुजबुजला वारा मागुन "अंधार भाजला आहे...."

व्याकूळ तमाच्या ओठी का विरहसुरांचे गाणे
मातीत वर्तुळे करतो ..तो थरथरत्या पायाने
का आज गरजता सागर.. डोळ्यात व्यापला आहे
कुजबुजला वारा मागुन "अंधार भाजला आहे...."

पल्याड ढगांच्या आहे वाजते कुणाचे पैंजण
ती येते आहे म्हणुनी अंधार विव्हळतो क्षणक्षण
या सुंदर तरुणीपायी रात्रभर जागला आहे
वाटेत पाय अडखळला... "अंधार भाजला आहे...."

उघडले दिशांचे पडदे क्षितिजाची खिडकी हलली
अंधार चरकला थोडा पापणी भयाने लवली
घेऊन सुगंधी जखमा तो दूर चालला आहे
आजही पहाटे नकळत  "अंधार भाजला आहे...."

-- संतोष

Thursday, September 1, 2016

तू पायवाट

तू पायवाट तू चंद्रकिरण तू काठी
तू श्वासामधल्या सप्तसुरांच्या गाठी
भय सरते ज्याने पाय उचलला जातो
तू स्पर्श तसा शाश्वत फ़िरणारा पाठी...

आभाळ निळाई मेघ मृदुल तू वारा
तू उत्तरेतला स्थिर सनातन तारा
स्पर्शातुन गंधित हिरवे कोंब उमलती
तू श्रावण माती चिंब क्षणांच्या धारा...

तू अल्लड शैशव झोक्यावरली गाणी
तू निर्मळ निर्झर तुषार झरझर पाणी
रोमांचित होती कडेकपारी कातळ
तू गुंजारव तू शीळ हवेची रानी...

तू वनराईचे नाजुक हळवे हसणे
निद्रिस्त खगांची आभाळाची स्वप्ने
तू नभातल्या लखलखत्या चांदणवाती
तू चंद्राची थरथर रजगंध झिरपणे...

तू क्षितिजाच्या थरथरत्या केशरमाळा
नवतरुणीच्या पदराचा चंचल चाळा
तू आरशातले रुप स्वतःचे फ़सवे
तू चुकलेल्या हुरहुरत्या कातरवेळा...

तू हिरव्या फ़ांदीवरचा मनमथ रावा
तू गोकुळातला खट्याळ मंजुळ पावा
तू किर्तन अभंगवाणी आर्त भुपाळी
तू मंदिरात भक्तांचे आर्जव.. धावा...!!
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

वासुदेव

पायात घुंगरु टाळ कपाळी मोरपिसाचा तुरा
ओठात इठुचे नाव घालितो साद निळ्या अंबरा
वासुदेव आला घरी टाक भाकरी तव्यावर आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई....

छम्माक वाजला टाळ धावले बाळ अंगणी आले
घरधनी उचलुनी फाळ तुडवण्या गाळ पहाटे गेले
वासरे लाडकी घेत पहा रांगेत निघाल्या गाई
वासुदेव आला घरी भाज भाकरी तव्यावर आई...

सांगतो एक बातमी तुझी लक्षिमी खरी धाकातं
शोभतेही बावनकशी नथणि छानशी तुझ्या नाकातं
गावात तुझ्यासारखी गुणी पारखी कुणी ना बाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई...

शेतात उभी बाजरी कडाला तुरी टप्पुरं दाणं
झोपडीमधी अंधार तरी भरणार उद्याला सोनं
संसार तुझा पंढरी इठोबा घरी तुच रखुमाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

सळसळे रान ओघळे पान

सळसळे रान ओघळे पान
मोहरुन येते धरणी
वाजवीत काकण निळेनिळे
वाहते नदीचे पाणी...

चोळीत तंग चोरुन अंग
नाहून सावली ओली..
कस्तुरीगंध पसरुन मंद
पावले उन्हाची आली...

हा पदर खुला नाजूक झुला
वेलींचा फ़ांदीवरुनी
पाहून पवन झाकून नयन
थरथरते अल्लड तरुणी...

पालवी खुले पळसास फ़ुले
केशरी सांडला रंग
कोवळे तुरे गवतात हिरे
पाखरु वेचते दंग...

झाकुनी तीळ अंगास पीळ
चालली कुठे सावली
क्षितिजात रवी वाजवी शीळ
पाहून सखा लाजली...
-- संतोष वाटपाडे (नाशिक

सारी भेगाडली भुई

सारी भेगाडली भूई अंघुळीला वारा नाई,
प्वाट खपाटीला गेलं कुरणात चारा नाई ॥

माझी उपाशी लेकरं
तरी देत्यात ढेकरं
ढेकळात लोळताना
गेली घासून ढोपरं...
उन्हामंधी तापलेली सारी जिमीन वांझुटी,
माजा नागडा संसार आडुशाला काई नाई॥

हाडकाच्या काड्या केल्या
चामडीच्या नाड्या केल्या
वावराच्या डोहामंधी
वंजुळीच्या व्हड्या केल्या...
नरड्यात घोट नाई थारुळ्यात मोट नाई,
डोळ्यामधी आलं देवा थेंब माजं खोटं नाई॥

डोईवर पागुट्याचं
वझं सोसंना सोसंना
आभाळात पाझराया
यक ढगही दिसंना...
गरीबाच्या आविक्षाचं कोणालाच मोल नाई,
उर बडवाया गेलो देव देवळात नाई॥
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

अशा पाखरांनी कुठे जायचे

निवारा नसे ज्या मुक्या पाखरांना
अशा पाखरांनी कुठे जायचे...
कपाळावरीच्या व्यथा सोसवेना
तुझे नाव देवा किती घ्यायचे...

उन्हासोबती सावली दूर गेली
तुरुंगापरी जाहली वंचना..
जिथे साथ होती हवी साजनाची
मिळाली तिथे केवढी वेदना..
गुन्हा ना जरी माझिया प्राक्तनाचा
तरी का प्रभू मी बळी जायचे...॥धृ॥

भुकेल्या घराला सहारा मिळाला
चुलीची व्यथा जाणली ना कुणी..
रिकाम्या घराची खुली सर्व दारे
झुरावी तुळस रोज का अंगणी..
मला लेकरू ना दिले सोबतीला
कसे गीत मी बोबडे गायचे.....॥धृ॥

सुखे कोरडी लाभली जीवघेणी
जखम मात्र ओली कशी आतली ..
उभा जन्म मातीमधे गाडलेला
कुणाला न माझी तमा वाटली..
सदा स्मित ओठावरी ठेवताना
किती घोट दुःखा तुझे प्यायचे.....॥धृ॥
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)

संतप्त ऋषीचा साप

डोहात कोरड्या दिसतो खोल तळाला
संतप्त ऋषीचा शाप..
काठावर आचके देतो संथगतीने
अतृप्त विषारी साप..

सोडून एकटी कुठे निघाली आहे
निद्रिस्त तरुची छाया..
फेडली तिची कोणी झगमगती वस्त्रे
नागवी तिची का काया..

कोवळ्या कुण्या कोंबावर टपला आहे
निर्लज्ज भुकेला डोळा..
पाहिजे त्यास नेमका न मिळतो आहे
मृत्युचा अवघड चाळा..

अवलाद कलीची हासत फिरते रानी
आताच कापुनी नाळ..
त्या तेजोमय गोलाच्या ठिकर्‍या झाल्या
पेटला कधीचा जाळ..

सांगाडे कवट्या माळावरती पडल्या
देतात कुणाला हाक..
वार्‍यावर उडते भिरभिर वावटळागत
का हतबलतेची राख..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

कोरड्या नदीच्या काठी

कोरड्या नदीच्या काठी
जोहार कुणाचा आहे..
सरणात पेटता दरवळ
निद्रिस्त तनाचा आहे..
खांद्यावर कोण उन्हाच्या
घागर ठेवून निघाला..
बोडक्या मुक्या गर्दीतुन
आखूड हुंदका आला........

निष्पर्ण तरुच्या खाली
विस्कटली विधवा रडते..
एकेक पान सुकलेले
ओघळते पायी पडते..
जे जमले होते गेले
डोळे ना पुसले त्यांनी..
खरवडले भाळावरचे
हिरवे कुंकू हातांनी........

आकाशी हुंगत आहे
घारीचा व्याकूळ डोळा..
पदराखाली फुललेल्या
नवतरुणीचे वय सोळा..
बेवारस आभाळाच्या
ठिकर्‍या पायात विखुरल्या..
विझताना चांदणवाती
डोळे मिटण्यास विसरल्या........

जोगवा मागण्या आला
दारात तांबडा जोगी..
अंधुकशा वाटेवरती
थबकला भुकेला रोगी..
निष्प्राण लाकडे विझली
आकाशी राख उडाली..
विधवा झाडास बिलगली
क्षितिजावर संध्या झाली..........

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

लागली आग पोटास (भवानी )

लागली आग पोटास, हाक कोणास, द्यायची देवा
शेतात गिधाडे मुक्त, पाहुनी तृप्त, वाटतो हेवा
एकटे रिकामे शेत, गुराचे प्रेत, ढिगारा काळा
लेकरु उपाशी आत, मिळेना भात, सोडली शाळा..

गोफ़णीत गोटा टाक, पाखरु मार, सांगतो आहे
खुंटीस माळ मी आज, सोडुनी लाज, टांगतो आहे
घेऊन गळ्याचे घोट, भरावे पोट, हीच लाचारी
फेडण्या पिढीचे पांग, करु का सांग, दरोडेखोरी..

हंबरे वासरू गाय, करावे काय ,कळेना काही
ठेवले जरी राखून, गवत झाकून, द्यायचे नाही
टोचते घशाला भूक, जाळते थूक, जिभेची ग्वाही
थांबले थेंब डोळ्यात, कधी घामात, प्यायचे नाही...

मुर्दाड भिताडावरी, रित्या घागरी, पसारा दारी
चालली कुणाचीतरी, विठूच्या घरी, मुक्याने वारी
झाकण्यास उरले काय, पांढरे पाय, तमाशा नाही
चिंधूक फाटके एक, नागडी लेक, ठेवते आई...

दुःखात राहणे नको, पाहणे नको ,मोजतो घटका
घेऊन छताला फास, सोडतो श्वास ,भेटते सुटका
जोमात वाढते व्यथा, गाजते कथा ,फायदा नाही
जन्मास वायदे खास, फक्त मरणास ,कायदा नाही...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)
[भवानी वृत्त = 13 + 8 + 9]

माझा बाबा

माझा बाबा मांडीवरती वळता वळता दोरी
रटाळवाण्या एक दुपारी बसला होता दारी
समोर पसरवलेली होती जमीन काळी सारी
अंग जाळत्या उन्हात होती माती तळमळणारी....

खुरटे होते केस पांढरे त्याच्या दाढीवरती
दुरुन जाणवणारी थरथर होती मानेवरती
घाम निथळता अंगावरचा टोचत होता बहुधा
माशा भणभण करीत होत्या ओल्या डोक्यावरती...

मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही....

गुडघ्यावरती तळपायाला टिचरं भळभळणारी
तरीही डोळ्यामधे काळजी टपटप ओघळणारी
दिंडी गेली रित्या हाताने दारावरुन परतून
व्यथा मनाची हीच एकटी पुन्हा पुन्हा सलणारी.....

धोतर चिरले होते तेथुन चिंध्या लोंबत होत्या
उष्ण झळांच्या अधीर जळवा गाली झोंबत होत्या
बांधावरती नुसत्या फिरत्या गरीब काही शेळ्या
दारामधला बाबा पाहून उगाच थांबत होत्या....

परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता.....
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)