Friday, February 1, 2019

तुम्ही कवी आहात ??

तुम्ही कवी आहात !!! तुम्ही मुक्तछंदात लिहिता !!! मला तर फार आवडतात मुक्तछंद ..... बरं तुम्हाला वृत्तबद्ध कविता नावाचा प्रकार आपल्या साहित्यात आहे हे माहितीय का???? नसेल तर माहीत करून घ्याल का??? वृत्तबद्ध लिखाण शिकू नका हो ..... मात्रा बित्रा मोजू नका .... फक्त माहिती असू द्या की असाही एक प्रकार साहित्यात आहे...

हे वर लिहिलेले स्वगत आहे पण हे मनात येण्यामागची कारणेही तशीच आहेत. अगदी सुरुवातीलाच मुक्तछंदातली कविता मुलांच्या अंगात पेरली गेली , मुरवली गेली किंवा रुजवली गेली , त्याच वेळी वृत्तबद्ध कविता प्रकार किमान कानावर टाकायला हवा होता किंबहुना टाकायला हवा असे मला वाटते. पुढे ज्याची त्याची आवड आहे आणि आवडीनुसार क्षेत्र निवडले जाईलच ही नैसर्गिकता आहे. आज एखादा कवी जेव्हा भूत पाहिल्यासारखा वृत्तबद्ध कवितेला बघतो तेव्हा वाईट वाटण्याऐवजी त्याची कीव वाटते. हा प्रकार इथपर्यंत गेलाय की वृत्तबद्ध कविता म्हणजे आजकालच्या काही लोकांनी साहित्यिक काड्या करून काहीतरी वेगळे शोधून आणले असावे आणि त्याला काही एवढे मनावर घ्यायचे नसते असे काही कवींच्या हावभावातून जाणवते.

कुण्या एका प्रकाराची बाजू घेऊन दुसऱ्याला कमी लेखणे हा माझा उद्देश नाहीय. माझे म्हणणे आहे की तुम्ही किमान दखल तर घ्या ... वृत्तबद्ध कविता अथवा गजल आशयाला परिपूर्ण न्याय देऊ शकते आणि मुक्तछंदात जे मांडायचे तेही शिस्तीत मांडू शकतात... मंचावर मोठमोठ्याने ओरडून, छाती बडवून सादर केलेल्या आणि टाळ्या मिळवणाऱ्या रचना खरोखर कविता आहेत का??? कुणी यावर चर्चा करायला तयार आहे का? मुळात त्याचा शोध कुणाला घ्यायचा नाहीय... नाटक, कविता, गीत या प्रकारात भिन्नता आहे ना .... मग आपण जे मुक्तछंद म्हणून सादर केले ते एकपात्री नाटक तर नव्हते???? बहुतांश कविता तशाच जाणवतात आजकाल..... चार मोठी पाने भरतील एवढ्या लांबीची ही कविता सादर करताना तो कवी मांडी थोपटतो , हातवारे करतो ,अभिनय करतो तेव्हा तो नाटक सादर करत असतो आणि आपण त्याला कविता समजून दाद देत राहतो... मुक्तछंद म्हणजे गंम्मत वाटते लोकांना ... स्वतःशी झालेला संवाद असा मंचावर आरडाओरड करून सादर करायचा असतो का??? अर्थात सादरीकरण हा मोठा विषय आहे ...पण त्यावर आपण नंतर कधी चर्चा करू ... सादरीकरण आणि अभिनय हे वेगवेगळे पैलू आहेत हे मात्र जाणून घ्यावे ...

मला मुक्तछंद लिहिता येतो किंवा छान लिहिता येतो असा माझा गैरसमज अजिबात नाहीय. मात्र मला तो खूप चांगल्या रीतीने ओळखता येतो आणि जगताही येतो यावर मी ठाम आहे. वर्णनात्मक कविता मुक्तछंदातून मांडणे म्हणजे केवढी मोठी मस्करी आहे मुक्तछंदाची आणि केवढा मोठा अपमान आहे गद्याचा !!! मुक्तछंदाला विषयांचे बंधन असायला नसले तरी कोणते विषय वर्ज्य आहेत हेही लिहित्या हातांनी ओळखायला हवे....

रानातल्या झाडांना
हिरवी हिरवी पाने आलेली आहेत
आणि फांद्यांवर काही फळेसुदधा
लागलेली दिसत आहेत
त्याच झाडावर काही पक्षांनी
घरटी बांधलेली आहेत....

हिला कविता म्हणायचे का? मग गद्य काय आहे? ... आता बघा ! संवादातून जन्म घेणारी कविता आहे तर तिचा आशय सुद्धा तसाच असावा की नाही? ..... काही व्यक्तींचा आपसात चाललेला संवाद या कवितेत कसा घेऊ शकतो आपण??

ती म्हणाली" मी बाजारात चालले"
मग मी म्हणालो "कशाला"
ती पुटपुटली "भाजी आणायला"
मग ते म्हणाले "आम्हीही येऊ का"
शेवटी ती म्हणाली "नाही मीच जाऊन येते"

असे गद्याचे तुकडे केल्याने कविता बनते का कधी?.... काही लोक तर याला सुद्धा चाल लावून सादर करतात !!! चाल लावून सादर करणारा वर्ग आजकाल वाढलाय हे वेगळे सांगायला नकोय... याला प्रशंसेचा हव्यास कारणीभूत आहे .काही कवी गातातही छान, त्यांच्या कविता असतातही सुंदर मान्य आहे . माझे अनेक जवळचे मित्र- मैत्रिणी तसेच वलयातले अनेक लोक उत्तम गातात आणि लिहितात सुदधा...ही ईश्वरदत्त देणगी आहे यावर माझा विश्वास आहे ...पण म्हणून सर्वांनीच गायला हवे का? आणि वरून अभिव्यक्तीस्वातंत्र्य याविषयावर बोलायला तयार असतात लोक.. ओघात विषय आला म्हणून तरन्नुम वर घसरलो .... मुद्दा तो नाहीच आहे आपला….

मुळात कवितेवर होत असलेले कुसंस्कार टाळले गेले पाहिजेत आणि हे प्रकार सर्व साहित्यिकांनी मिळून करायला हवेत. एकीकडे व्हाट्स अप वर कवितासदृश अनेक पदार्थ हिंडत असतात जे कविता प्रकारात मुळीच मोडत नाही तरीही कवितेची ओळख नसलेले लोक कविता समजून त्यांच्या समूहात आनंदाने शेअर करतात ... आणि मग ते लोक वाहवा करत सुटतात.... इथून पुढे एक पिढी त्या पदार्थालाच कविता समजत राहते ही बाब फार गंभीर आहे.... सर्वगुणसंपन्न वृत्तबद्ध कविता, गजल , मुक्तछंद अथवा कोणतीही कलाकृती कशी असते हे वाचकांना समजावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे ... व्हायरल झालेल्या अनेक कविता(?) एकदम भंकस असतात तरीही लोक वरती केप्शन टाकतात .... "माझ्या वाचनात आलेली आजवरची सर्वात सुंदर कविता" ....असे कसे म्हणू शकतात राव !!! आयुष्यात जर तुम्ही मोजून 2 4 कविता वाचल्या असतील आणि त्यात ही अर्थहीन कविता तुम्हाला आवडली असेल तर काय करणार ?? आजूबाजूच्या किमान शंभर लोकांच्या मनावर ही कुसंस्कारीत कविता स्वार होऊन बसणार.

जेव्हा शालेय अभ्यासक्रमात कविता पाठ करणे शिकवले जाते त्याचवेळी मुलांना सर्व काव्यप्रकार शिक्षकांनी शिकवायला हवेत. वृत्तबद्ध/ गेय कविता का जन्माला आली किंवा तिचे फायदे काय हेही सांगायला हवे. पुढे जाऊन मुक्तछंद कविता कशी उदयास आली आणि तिच्या लेखनातून आपल्याला कसे समृद्ध होता येते हेही शिकवले पाहिजे. यासाठी स्पेशल आठ तास शिकवले पाहिजे असेही काही नाहीय. अर्धा तासात समजावले तरी मुलांना फरक तरी कळेल आणि प्रकार तरी माहिती होतील. शिक्षकांना याचे महत्व माहिती असावे. व्याकरण, बोली भाषा, कविता, मांडणी यावर काही बोटावर मोजण्याइतके शिक्षक मेहनत घेताना दिसतात हे खरे असले तरी बऱ्याच ठिकाणी या गोष्टी सोयीस्कर रीतीने वगळल्या जातात. पोट भरण्यापूरते शास्त्रीय/ गणितीय शिक्षण देताना कलेला अव्हेरले जातेय याकडे कुणाचे लक्ष नाहीय. कोणतीही कला खरेतर गणित अथवा शास्त्रांचा पाया आहे हे का समजावले जात नाही विद्यार्थ्यांना ? वर्षाभरात फक्त मराठी दिनानिमित्त मराठी कवितेला शाळा-कॉलेजमध्ये पाहुणी म्हणून बोलवाल आणि इतर दिवस तिला टाळाल तर तिचा आणि मुलांचा विकास कसा होणार? कविता ही आर्थिक उत्पन्नाचे साधन नसले तरी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या सर्व साधनांचे मूळ आहे . कारण कविता ही आत्मिक ऊर्जा आहे म्हणून ती सुसंस्कारित असणे फार गरजेचे आहे.

जे सुजाण पालक मुलांना वाचनाची गोडी लावतात आणि ज्यांना साहित्यात खरेच स्वारस्य आहे त्यांनीही त्यांच्या मुलांना कविता आणि अकविता यातला फरक सांगायला हवाय. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे चांगल्या कविता दडून राहतील आणि कविता नसलेल्या गोष्टी पुढे जातील अशी शक्यता नाकारता येत नाही. आजकाल तथाकथित आश्रमातून/ मठातून काव्यावर रोज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. फाफडयाच्या आकाराची कविता, जिलेबीच्या आकाराची कविता, खमण ढोकळा, असेंडिंग कविता , डिसेंडिंग कविता , सुप्रभातीय कविता !!!! वाट लावलीय राव लोकांनी .... शून्य भांडवलात सुरू करायचा व्यवसाय आहे जणू !!! त्यात पुन्हा यांच्या स्पर्धा होतात आणि हे प्रमाणपत्र सुद्धा देतात विजेत्यांना ..... कमाल आहे की नाही ? एकतर फाफडीय कविता तुम्ही उदयास आणून इतर सर्व प्रकारांचा अपमान करत आहात त्यात वरून त्यांना पुरस्कार देत आहात म्हणजे ही बंडखोरी झाली.

मी वृत्तबद्ध कविता, गजल यांच्यावर नितांत प्रेम करतो पण तेवढेच प्रेम मुक्तछंदावरसुदधा करतो हे पुन्हा एकदा नमूद करावे वाटतेय. माझ्या मित्रयादीत असेही मित्र आहेत जे उत्तम मुक्तछंद लिहितात आणि सोबत वृत्तांची माहिती करून घेतात. वेळ आल्यास त्यावर चर्चाही करतात. सर्वाना सर्वच प्रकार एकाच वेळी,सारख्याच ताकदीने हाताळता येतील असेही काही नाही त्यामुळे ती अपेक्षा करणे चुकीचे आहे. माझे म्हणणे केवळ इतकेच आहे की साहित्यात असलेल्या इतर प्रकारांची तुम्ही माहिती ठेवा आणि तिचा प्रसार सुद्धा करा ,जेणेकरून लोक अंधारात राहणार नाहीत आणि चुकीच्या मार्गाला सुद्धा जाणार नाहीत. प्रत्येकाची वृत्ती, अभिरुची त्याला योग्य त्या वेळी साक्षात्कार देईलच. वाईट गोष्टींना वाईट वाईट म्हणणे गरजेचे आहे. दर्जेदार लिखाण वाचकापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि निकृष्ट लेखन जागीच थोपवले पाहिजे. गुणवत्ता आधारित निकष कवितेला लागायला हवेत नाहीतर येत्या काळात साहित्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल आणि त्याचे परिणाम पुढच्या सर्व पिढ्याना भोगावे लागतील . बस इतकंच ....

-- संतोष