रौद्र रस
ख्रिस्तपुर्व काळात वेदांमधील साहित्यिक कलांचा अभ्यास करून "नाट्यशास्त्र" हा अनमोल ग्रंथ लिहिणार्या भरतमुनींनी विविध अनुभूतींमधून प्राप्त होणार्या स्थायी भावांना रस संबोधले . रस ही नाट्य, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. ...भरतमुनींनी त्यांच्या चिंतनातून उतरलेल्या शास्त्रात आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. त्यात श्रृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, वीभत्स आणि अद्भुत या रसांचा समावेश होता मात्र पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.
ज्याचा आस्वाद घेतला जातो तो रस अशी साधी सोपी व्याख्या करून मानवी विचारप्रक्रियेत तयार होणार्या प्रसंगारूप भावनांना नऊ रसांमधे विभाजित केले गेले. स्थायी म्हणजे तो भाव जो आपल्या चित्तात वासनात्मक किंवा कामनात्मक रुपात चिरकाल टिकून राहतो. मनुष्यप्राण्याच्या विचारप्रक्रियेत असलेल्या व्यभिचार भावाच्या उपस्थितीमुळे विविध रसांचा आस्वाद घेणे शक्य होते. स्थायी भाव , विभाव ,अनुभाव ,अष्टसात्विक भाव यांच्या प्रकियेतून रसनिष्पत्ती होते. आस्वाद घेणे म्हणजे स्थायी भाव. कशामुळे स्थायी भाव निर्माण झाला ते कारण म्हणजे विभाव. विभावामुळे चित्तावर झालेला दृष्य परिणाम म्हणजे अनुभाव. कुठल्याही एका भावावर स्थिर न राहण्याची वृत्ती म्हणजे व्यभिचार भाव. व्यभिचार भावामुळे देहात उत्पन्न होणारे भाव म्हणजे अष्टसात्विक भाव .अष्टसात्विक भाव म्हणजे स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा राहणे), स्वरभंग (आवाजात बदल होणे), कंप (शरीराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मुर्च्छित होणे)
थोडक्यात सांगायचे तर रसउत्पत्ती ज्या कारणामुळे होते ते कारण म्हणजे "विभाव". विभावाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आलंबन विभाव. ज्या कारणामुळे /क्रियेमुळे रसाची उत्पत्ती झाली ते म्हणजे आलंबन विभाव. (उदा. प्रियकर-प्रेयसी बागेत भेटतात तेव्हा त्यांच्यात प्रणयभाव निर्माण होतो म्हणून हे जोडपे आलंबन विभाव आहेत ).दुसरा प्रकार आहे उद्दीपन विभाव. आलंबन विभाव ज्या कारणांमुळे उद्दिपित झाला ते कारण म्हणजे उद्दिपन विभाव. (उदा. ते दोघे बागेत भेटतात आणि बघतात की तिथे झाडावर फुले उमलली आहेत आणि पक्षांच्या ध्वनीतून प्रणयाराधना ऐकू येतेय. या दोन कारणांनी त्यांच्या मनात/देहात प्रणयभाव बळावला. तर ही अतिरिक्त कारणे म्हणजे उद्दिपन विभाव) व्यभिचार या शब्दाचा अर्थ जरीही आजकाल वेगळा सांगितला जात असेल तरी त्याचा अभिप्रेत अर्थ भरतमुनींनी पुर्वीच सांगितला आहे. व्यभिचार म्हणजे भावनांची चंचलता. कोणत्याही एका भावनेवर स्थिर न राहण्याची चित्तवृत्ती !
प्रत्येक रस आणि त्याची सिद्धता उदाहरणे हे अत्यंत गहन आणि आनंददायी काम असले तरी आपण या नऊ रसांपैकी एक असलेला रौद्र या रसाबद्दल जाणून घेऊ या. क्रोध ही भावना घटना, प्रसंग, अभिनय यातून सिद्ध करत मेल्यावर तिच्यातून रौद्र रसाची निर्मिती होते. प्रत्येक शब्दावर जोर देऊन, रागाने लाल होऊन, वरच्या आवाजात बोलून एखादी व्यक्ती तिच्या भावना व्यक्त करते त्यावेळी तिचे डोळे विस्फारलेले असतात, रागाने अंगाचा थरकाप होत असतो, भुवया वर चढलेल्या असतात. ही सगळी लक्षणे रौद्र रसाची आहेत. क्रोध चीड किंवा रागाचे वर्णन जिथे जिथे असते तिथे तिथे रौद्ररस प्रगट होतो.
१) स्थायी भाव - क्रोध
२) आलंबन भाव - ज्यांच्यामुळे क्रोध आला ती/त्या व्यक्ती
३) उद्दीपन भाव - कशामुळे क्रोध ते कारण
४) अनुभाव - क्रोधामुळे झालेला परिणाम.उदा. चेहरा लाल झाला , दातांची सळसळ ,मुठी आवळल्या ,गर्जना इत्यादी
५) अष्टसात्विक भाव- उद्वेग , आवेग , चीड ,मद , मोह , उग्रता इत्यादी
शृंगार रस
कोवळ्या उन्हांनी घ्यावा वेचुन धुंद प्रियेचा रंग
दरवळतो आहे रोम रोम लखलखते आहे अंग
विस्कटलेल्या केसांमधुनी रतिचंद्र उगवला आहे
अन तळव्यावरची मेंदी आहे स्वप्नप्रदेशी दंग...
............................
हास्य रस
अडकून पाय पायात धपटली उन्हे प्रियेच्या दारी
उसळून धूळ नाकात चालली अंगणातली सारी
चोळून नाक लावून हात स्पर्शण्या प्रियेला माझ्या
वेंधळ्या उन्हांची पितांबरे दिसली मज भळभळणारी...
.................................
करूण रस
लाघवी उन्हे झुकवून मान थांबली प्रियेच्या दारी
पापणीतली आसवे वाहिली अंगणामधे सारी
स्पर्शण्या तिला आर्जवे किती ओठात कोंडली त्यांनी
हुंदक्यातली एकेक हाक जाणवली गहिवरणारी...
.............................
रौद्र रस
छाटेन पाय आता जरका आलात तुम्ही दारात
चोंबड्या उन्हांनो नकात राहू फिरण्याच्या नादात
माझिया प्रियेची झोप मोडली तुम्ही येउनी जरका
सांगून ठेवतो तुम्हास मी जाळेन आज सरणात ....
.............................
वीर रस
कोवळी उन्हे वेगात धावली पुन्हा प्रियेच्या दारी
पाहून प्रियेची मोहकता रांगेत थांबली सारी
धावून तिच्यावर स्पर्श त्वचेचा वेचायाचा होता
बेचैन उन्हांची नजर त्याक्षणी दिसली भिरभिरणारी...
..............................
भयानक रस
पाडून कुणाचा खून धावले ऊन प्रियेच्या दारी
हत्यार जुने पाउले उमटली लाल अंगणी सारी
पकडून गच्च बाहूत प्रियेचा स्पर्श वेचण्यासाठी
या धुर्त उन्हाची मत्त लालसा होती डचमळणारी....
..............................
बीभत्स रस
शेंबडी उन्हे चाटून नाक धावली प्रियेच्या दारी
थुंकून भिजली त्यांनी माती अंगणातली सारी
स्पर्शता तिला हातावर दिसली चिकट चिकटसी लोळी
शेंबूड मला वाटला त्याक्षणी चमकी चमचमणारी....
..............................
अद्भूत रस
झालीत प्रकट ही उन्हे कोठुनी पुन्हा प्रियेच्या दारी
स्पर्शाने त्यांच्या अंगणातली फुले उजळली सारी
अलवार गुप्तरूपात जाऊनी स्पर्श तिला करण्याला
जादुई उन्हांनी केली त्यांची कायाही सोनेरी...
..............................
शांत रस
दारात प्रियेच्या नये पाझरु ...पिवळ्याजर्द उन्हांनी
अंगणासही रंगवू नये पायाच्या नितळ खुणांनी
मी येताना आणेन केतकीफुले कस्तुरी गंधाची
सजवेन प्रियेच्या केसांना या ओल्याचिंब फुलांनी..
-- संतोष वाटपाडे
No comments:
Post a Comment