Friday, November 25, 2016

वसुंधरा

सैल सोडली वसुंधरेने काचोळीची गाठ
चमकत आहे कळवळणारी तिची जांभळी पाठ ...
तुडूंब भरले पात्र जरीही हिरव्या आठवणींनी
शांतपणे का रडतो आहे कालिंदीचा काठ...

मुकी सावली फ़िरते घेउन घागर डोक्यावरती
पाल ठोकले तप्त उन्हाने विरक्त मातीवरती
निवडूंग झोपले पाय दुमडुनी निश्चल केविलवाणे
मात्र गिधाडे चोच मारती मिटल्या डोळ्यावरती...

कळसावरचा उदास झेंडा हवेत फ़डकत आहे
घुमटामधला देव आंधळा काठी शोधत आहे
म्हातारे आभाळ तुडवते वाट निवार्‍यासाठी
वारा खचला जागोजागी धापा टाकत आहे...

कुणीतरी कोवळ्या कळीचा देह जाळला आहे
गवतामधुनी उद्वेगाचा धूर उसळला आहे
जुने झाड कोसळले.. आली मुळे भितीने वरती
क्षितिजावरचा डोह केसरी कुणी ढवळला आहे...!

-- संतोष

जास्वंद

तू मत्त लालसर काया जास्वंदीची
मी तृषार्त सागर बघतो वाट नदीची
सुस्तावत पडल्या इथल्या काजळराती
ये विरहफ़ुलांची रचली रास कधीची..

आसक्त तनाची ओंजळ भरुनी बसलो
स्वप्नांच्या उत्कट डोही अर्धा धसलो
खांद्यावर फिरला कसला मोरपिसारा
मी वळलो मागे..फ़सलो नकळत हसलो...

नेसून तमाची साडी.. जळते समई
वार्‍याची फुंकर येते नाजुक समयी
उंचावत जाते ज्योत पुन्हा थरथरते
खेचते तनुला व्याकुळ चंचल तनयी...

चांदण्यात नाभी दिसते निशीगंधेची
वल्कले सुकवते ती निजल्या संध्येची
पाहून तिला मज तुझी आठवण येते
मी वृंदावन ...तू पायवाट राधेची...

श्वासांची तुंबळ युद्धे चिंब रणावर
ताबा नाही माझा बेशिस्त मनावर
मी कोसळेल हिमशिखरावरुन आता
ये मैफलीत..मी मद्यधुंद.. तू सावर..

-- संतोष

सुईण

तिनं दाबली नरडी हाक आली ओठावर
आली धावून वेदना सुईणीच्या हातावर..

सुईणीच्या हातावर पोरं नागडे खेळते
नाळ वीतभर त्याची डोळे झाकून लोळते...

डोळे झाकून लोळते माती खाट्या वावरात
एक वांझुटं सपान तिच्या बोडक्या हातात..

तिच्या बोडक्या हातात निळी बांगडी जाईना
लेक माहेराला आली दोन दिवस राहीना..

दोन दिवस राहीना गाय बिनवासराची
तिची कास पान्हावली सय येते लेकराची...

सय येते लेकराची झोपडीतल्या आईला
तिने भाकर चारली इवल्याशा पाखराला..

इवल्याशा पाखराला ऊन छळते जाळते
घार आभाळात एक त्याला पाहून भाळते..

त्याला पाहून भाळते किती वेडी पडछाया
झाड वाळले उभ्याने त्याची हिरावली काया..

त्याची हिरावली काया त्याचा डोळा ओघळला
खाली कोरड्या मातीत अनवाणी रेंगाळला...

अनवाणी रेंगाळला बाप उन्हात सावळा
त्याला पाहून हासतो फ़ाटीवरचा कावळा...

फ़ाटीवरचा कावळा हाक मारुन येईना
कधीपासून ठेवला घास सुखानं खाईना..

घास सुखानं खाईना जीव अजुन जाईना
माया भरुन सांडली आज डोळ्यात माईना....

- संतोष