Tuesday, August 21, 2018

कमलाकर देसले आबा - एक चिंतनशील कवी

आपण मागच्या लेखात व्यक्तिची प्रकृती आणि तिच्या रचना यांचा मेळ कसा असावा यावर प्रकाशझोत टाकला. फ़ेसबुकात अनेक वर्तुळे आहेत ज्यांचा परिघ ५००० मित्रांचा आहे. आपण नजरेत येईल तेवढे वाचतो आणि काही आवडीचे कवी असतील तर त्यांच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या रचना वाचतो. असेच एक वर्तुळ आपलेही आहे, ज्यात अनेक दिग्गज साहित्यिक/कवी/लेखक/गायक,संगीतकार आणि चित्रकारही आहेत. त्यातलाच एक मित्रांना मित्र मानणारा आणि शत्रूंनाही मित्र मानणारा, मायाळूपणाच्या बाबतीत खुद्द आभाळाला लाजवणारा, मानेवर सर्रकन सुरा फ़िरवल्यागत शेर कानावर फ़िरवणारा, आपल्या वारकरी संप्रदायातून शब्दांची वारी पंढरीच्या वाटेवर रोज अव्याहतपणे नेणारा गजलकार मित्र आहे .

नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..होय आबा !! कमलाकर आत्माराम देसले......हे नाव घेतले की वलयातल्या प्रत्येक साहित्यिकाच्या डोळ्यात आपोआप आदराचे भाव निर्माण होतात. यामागचे एकमेव कारण आहे आबांची समावेशकता. खेड्यातील रहिवास,सुसंस्कारी देसले परीवार आणि भक्तीमार्गाचा अवलंब या गोष्टींमुळे आबांच्या लिखाणाची दिशा फ़ार वेगळी आहे. आता आपण बघू या प्रकृती !

आबांशी बोलणे म्हणजे सत्संग ..मी अगदी ठाम आहे विधानावर ! आजवर आबांशी जितक्या काही चर्चा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाल्या आहेत त्यातुन मी घेतलेले ज्ञान म्हणजे हा लेख असे म्हणता येईल .चुकूनही कुणाचे मन न दुखावणारे आबा आपल्या लेखनातून कसे व्यक्त होताना काळ अगदी सावध असतात. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की "कागदाचे पावित्र्य आपल्या लेखनाने नष्ट व्हायला नको." आपल्या लिखाणातून प्रेरक उर्जाच मिळावी असा निशचय करुन जणू ते लिहित असावेत. नुसतेच प्रासादिक,नुसतेच मार्मिक अथवा नुसतेच सैद्धांतिक लिखाण नाही त्यांचे...गजलेत स्वतःची प्रकृती ओळखून तिच्याशी निगडीत केलेली आयुष्याविषयीची/अनुभवांविषयीची साधी भाष्ये म्हणता येतील असे शेर आहेत त्यांचे...

अंकुराला दगड सुद्धा चालतो
जीवनाला फक्त संधी पाहिजे ..
***
इस्त्री फिरली दु:खाची दिनरात अशी, की -
आयुष्याचा कपडा अवघा सुंदर झाला ...
***
ही न शर्त , की गळ्यात गोडवा हवा
आतल्या स्वरात गुणगुणायला हवे..

हा आतला स्वर म्हणजेच आपली प्रकृती... एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान शिक्षक आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता चांगली अथवा वाईट कधीही नसते. कविता एकतर असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला. पण डोळे जिथे थबकतात तिथे नक्कीच आपल्या अपेक्षेशी/विचारांशी सुसंगत काहीतरी असते म्हणूनच आपण ती रचना वाचतो. आबांच्या लिखाणावर जीव जडण्याचे एकमेव कारण आहे साधेपणा. हा साधेपणा त्यांच्या प्रकृतीतून आलाय यावर नक्कीच कुणाचे दुमत नसणार !

खरं तर मनातून आवेगात आलेल्या भावनांच्या महापूराला कुठल्या परिमाणाने मोजायचा नसते. मुक्तपणे व्यक्त होणं हाच कवीचा स्वभाव; मात्र कविता निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे. वेदना- जाणिवा संवेदना त्याचसोबत आणि चिंतनाच्या मंथनातून कलाकुसर करुन विणलेले वस्त्र म्हणजे म्हणजे कविता होय. जेवढे तीव्र मंथन असणार तेवढे जास्त लोणी मिळणार . आबांच्या कविता/लेख/गजला काहीही वाचले की आपोआप "वाह्ह्ह्ह येते" ही वाहवा त्यांच्याव्यक्तित्वाशी संबंधित नसून त्यांच्या चिंतनाचा आपल्यावर होणारा परिणाम असतो ! दाखल्यासाठी हे शेर देता येतील...

कुठून येते पक्षांमध्ये तारतम्य हे ;
तुळशीवरती कधी कावळा बसला नाही ...
***
कल्पनेने तुला घामही यायचा ;
तू नितीमान होतास रे रावणा ...
***
खूप झाली अरे पुस्तके वाचुनी ;
जीवनाला जरा चाळले पाहिजे ...

प्रयोगशीलता आणि वैविध्य या दोन गोष्टीं समोर ठेवून लिखाण करत राहिल्यास वाचकाला मिळेल/ न मिळेल त्यापेक्षा जास्त आनंद आपल्या स्वतःला मिळवता येऊ शकतो. लेखकाची नजर चौफ़ेर फिरली पाहिजे जेणेकरुन त्या नजरेला निसर्गातले सर्व रस टिपता यायला हवे. कमलाकर आबांचे वाचन अफ़ाट आहे तरीही आबांनी अमुक एक कवीसारखे लिहा/लिहिले पाहिजे असे कधी म्हटले नाही कारण त्यांना स्वतःलाच एका विशिष्ट चाकोरीत लिहायला आवडत नाही.

त्यांचा दांडगा अभ्यास,छंदावर असलेला हातखंडा आणि त्यांची प्रयोगशीलता यातून निर्माण झालेली काव्यही आजन्म स्मरणात रहावीत अशी आहेत. सुंदर हस्ताक्षर,गोड गळा,संगीताची जाण, वाक:सिद्धी, लेखणीवरील संयमीत ताबा या गुणांचे मिश्रण स्मरणात रहावी म्हणून तर गेय काव्यांची निर्मिती झालीय. आजवर प्राचीन काळात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ गेय स्वरुपातच तर आहेत  ! त्यावेळी गद्य लेखन / दैनंदिन व्यवहारातल्या संवादाची भाषा अस्तित्वात असेलही तरीसुद्धा गेयतेकडे विशेष लक्ष दिले गेलेय. यातून एक शिकवण आपण नक्कीच घ्यायला हवी की वृत्तबद्ध/लयबद्ध लिखाण हे चिरकाल स्मरणात राहण्यास सोपे जाते आणि मनाला आनंदही देते. आबांची ही त्यातलीच एक कविता बघा....

पाऱ्यासम हातोहाती
सुख हळूच निसटुन जाते
सावलीसारखे साथी
हे दु:ख सोबती येते

वेश्येला कसले नाते,
भोगाला घेते भोगी
आवेग संपता उरतो
मग रितेपणाचा रोगी
मग कुरुप असली तरीही
पतिव्रताच पदरी घेते ..
सावली सारखे..

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

काही लोक यातून वेगळा अर्थ काढू शकतील ..की तंत्र शिकायलाच नको! आम्हाला नैसर्गिकरित्या,उन्मळून आलेली,प्रवाहित झालेली( वगैरे वगैरे) कविताच आवडते. पण अशा विधानांखाली दडून लिहिल्याने कुपोषित काव्ये जन्माला येऊ शकतात. माझ्या लिखाणावर वृत्तांचा संपुर्णपणे पगडा आहे हे मी मान्य करतो मात्र त्याचवेळी उत्कृष्ट मुक्तछंदांवर सुद्धा मनापासून प्रेम करतो आणि तसले मुक्तछंद मलाही लिहिता यावेत याचाही प्रयत्न करतो. मुद्दा हा आहे की तो मुक्तछंद माझ्या प्रकृतीचे प्रतिबिंब असावा. मुक्तछंदालाही एक विशिष्ट लय असते हे मी फ़क्त ऐकून आहे. ती लय नेमकी कशी ओळखावी हे मात्र मलाही माहिती नाही. त्यामुळे मला जो मुक्तछंद मनापासून आवडला तो नक्की लयीत असावा असा समज मी माझ्यापुरता करुन घेतो. मुक्तछंदात लिहिताना आबा वाचकाच्या काळजात हात घालतात...कसा ते बघा

सर्वांना दिसतात
तसेच दिसताहेत मलाही तुझे डोळे
पण सर्वांना दिसत नाहीत
ते विभ्रम पाहतो आहे मी तुझ्या डोळ्यात..
तुला माझी गझल ऐकतांना
गझल झलेली पाहतो मी

एखाद्या पट्टीच्या गायकाने
घ्याव्यात काही खास जागा
एकाच गाण्यात
तसा तुझा गाण्यासारखा चेहरा
तुझ्या साध्याच चेहऱ्यावर
उमटताहेत तशा काही जागा
फक्त जागांसाठी पुन्हा पुन्हा ऐकावे
तेच ते गाणे
तसा पाहतोय मी तुझा चेहरा
गाणे झालेला ..

तशी तू अगदीच वेगळी नाहीस
पण तू आहेसच वेगळी
भोवतीच्या गद्य चेहऱ्यात
उमटून दिसणाऱ्या
लोभस कवितेसारखी...

चांगल्या कवीला वाचकांची नस पकडता आली पाहिजे. आपल्यावर झालेल्या संस्कारांनुसार आपण शब्दांची निवड करतो. इशकृपेने तुम्ही-आम्ही अत्यंत समृद्ध भाषेच्या पोटी जन्म घेतला आहे. आपल्या भाषेत लिहिली गेलेली अनेक पुस्तके आहेत जी वाचली तरी येणार्याा हजार जन्मांचे सार्थक होऊ शकेल. मराठी भाषा भावनांच्या आवर्तनांना जसेच्या तसे मांडू शकते. आपली भाषा आपल्याला  आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची संधी देते. आबांची वृत्तबद्ध कविता वाचताना मनाचे संपुर्ण समाधान होते कारण त्यांची शब्दांची निवड आपल्या तृष्णेच्या जवळपास असते. ही कविता बघा..

सूर्याचा गोंदून जाळ , अंग आभाळ
तापतो माळ , उभ्या देहाचा
ये शामल संध्याकाळ , बांधुनी चाळ
वाजवित टाळ, तमाची वाचा

नावाला दोघे दोन, एकची प्राण
कुणाचे कोण , निरर्थक चर्चा
प्रेमाचे एकच गान, विलंबित तान
श्रुतीचा कान, सूर हा वरचा

असाधारण चिंतनातून आलेला एकेक शब्द काळजाला स्पर्श करतो. याचसाठी आपण आपल्या प्रकृतिला ओळखून त्यानंतर विषय निवडावेत आणि लिखाण करावे . आपल्या मित्रयादीत अमुक एकजण लिहितोय आणि प्रसिद्धी मिळवतोय म्हणून आपणही आता लिहिले पाहिजे या अट्टहासाने नैराश्य पदरी पडते. आपण कवितेकडे धावत जाण्यापेक्षा तिला आपल्याकडे येऊ द्यावे. स्पर्धा करत राहिलो तर थकवा येईल आणि आत्मानंदापासून आपण हळूहळू दूर जाऊ.

--- संतोष वाटपाडे

No comments:

Post a Comment