Tuesday, August 21, 2018

गोविंद नाईक आणि गजल

आभाळाच्या दिशेन बोट करुन ठणकावून गजलेचा शेर ऐकवणारा आपला गजलकार मित्र आहे जो उत्तम चित्रकारही आहे. नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..

नुकतीच जन्मलेली आहेत पाखरे ती
इतक्यात काय सांगू..आकाश काय असते..?

यातून त्याने नवोदितांना काही इशारा दिलाय  जणू !! परिपक्वता पुस्तकातून, वाचनातून अथवा श्रवणातून येत नसते....प्रत्येक लोखंडाला अनुभवाच्या भट्टीतून जाणे गरजेचे असते. त्यासाठी हवा फक्त संयम आणि संयम आहे म्हणूनच शेरात परिपुर्ण आशावाद जाणवतो.

एवढी का गढुळ झाली आसवें ही ?
टाकला कोणी खडा स्वप्नात माझ्या ?
****
विश्वासाने बोट कुणाला द्यावे धरण्यासाठी
जो तो इकडे टपून आहे हात छाटण्यासाठी..
****
छापले जातील सोयीस्कर उद्या काही रकाने
चालली आहे गुन्ह्याची चौकशी संगनमताने..

वरील सर्व शेरांमधे त्याच्या स्वभावाचे पैलू स्पष्ट होत आहेत. आपल्या आत जो त्रयस्थ बसलेला असतो त्याच्या नजरेतून बघणेही जमायला हवे. तरच गजलेच्या प्रत्येक शेरात आपण असामान्य आशय भरु शकतो.

एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान चित्रकार आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता/गजल चांगली अथवा वाईट कधीही नसते. एकतर ती असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला.

खरं तर मनातून आवेगात आलेला भावनांचा पूर कुठल्या फुटपट्टीने मोजायचा नसतो. आपल्या आतील कलेतून मुक्तपणे व्यक्त होणे हाच कवीचा मुळ स्वभाव असावा. कविता निर्मिती ही फार वेगळी प्रक्रिया आहे. आपल्या वेदना-संवेदना आणि चिंतन यांच्या मंथनातून बाहेर येणार सुंदर रत्न म्हणजे कविता. जशा प्रकारचे मंथन असणार तशाप्रकारची निर्मिती असणार आहे. मंथनातून अमृतही बाहेर पडेल ,विषही येईल तशा अनेक दिव्य गोष्टीही हातात येणार आहेत. हे मंथन करताना मात्र आपल्या अंतर्मनात परिणामांची जाणीव आधीपासून ठेवायला हवीय.

कविता/गजल कशी तयार होते, कशी लिहावी याचे काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. त्यामुळेच त्यांची व्याख्या करणंही अगदी कठीण आहे. आपल्या पुर्वजांनी साहित्यात जे काही लिहून ठेवलेय त्याच्या आधारे आपण काही विशिष्ट निष्कर्ष अथवा ठोकताळे बनवून घेतले आहेत. हे लिखाण आपल्याला अनेक प्रकारे मार्गदर्शनही करते मात्र त्याच लिखाणाला प्रमाण मानुन आपली दिशा ठरवणे हेही चांगले नाही. पुर्वजांनी आपल्यासाठी शिडी बनवून दिलीय जेणेकरुन उंच शिखरावर आपल्याला पोहोचता येईल. पण सतत त्या शिडीचा वापर करणे किंवा इतरांनाही तेच सांगणे म्हणजे अतिरेक ठरेल. अशा कृतीने आपली मुळ सृजनशक्ती चेंगरली जाऊ शकते.

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार  केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

कोणतेही वृत्तबद्ध लेखण आपल्या वृत्तीतूनच परावर्तित होत असते. गोविंद नाईक हा माणूस सडेतोड स्वभावाचा , कुणाचीही बुराई न करणारा आणि वाईटात वाईट परिस्थितीतून मार्ग काढत चेहर्‍यावर हसू ठेवणारा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक कवितेतून अथवा शेरातून त्याच्या स्वभावगुणांचे प्रतिबिंब दिसून येते. कला हे व्यक्त होण्याचे साधन आहे त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या प्रकृतीनुसार आणि प्रकृतीने निवडलेल्या कलेनुसार व्यक्त होत असतो. कुणाला सामाजिक जाणिवांवर भाष्य करावे वाटते तर कुणाला निसर्गावर लिहावे वाटते. कुणाला केवळ नातेसंबंधांवर लिहावे वाटते तर कुणाला प्रणयाराधना आवडते. आपल्या प्रकृतीला वगळून काही लिहायचा प्रयत्न केलाही तरी ते लिखाण वाचकाच्या मनात खोलवर शिरू शकत नाही किंबहुना आपल्याला स्वतःलाच ते रुचत नाही.

गरज नसली तरीही चालण्याची हाव सुटते
खुळ्या नादात शहराच्या सुखाचे गाव सुटते

जिथे फिरतात चकव्यासारख्या अंधारवाटा
तिथे अफवा उजेडाची किती भरधाव सुटते

असले विचार केवळ संवेदनशील मनातूनच बाहेर येऊ शकतात. भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मोजक्या शब्दात बरेच काही सुचवण्याचा प्रयत्न केलाय. आपण फक्त आपल्या जीवनाशी या शेरांची सांगड घालून बघायला पाहिजे. आपल्या कलेचा योग्य वापर आणि अनुभवांनी शिकवलेले धडे सुत्रात टाकून समाजासमोर ठेवताना हे लिखाण काळाच्या कसोटीवर घासले जाणार आणि खरे उतरणार आहे असा त्यांना ठाम विश्वास आहे....असायलाच हवा ! कारण हे केवळ वैयक्तिक विचार नाहीत. हे विचारप्रवाह आहेत जे आपल्या आजुबाजुला वाहत असतात आणि आपल्याला जगण्याचे भान शिकवत असतात.

मुद्दा हा आहे कि वृत्तबद्ध लेखन आपल्या प्रकृतीच्या मंथनातूनच शक्य होते. बारकाईने प्रत्येक कवी/गजलकाराच्या लिखाणाकडे पाहिले तर प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. तसं बघायला गेलं तर मात्रासंख्या,सुत्रे,लगावली सर्वांच्याच पाठ असतात . कवितेला/गजलेला नेमकं काय हवे हेही माहित असते. फरक असतो फक्त अंमलबाजवणीत. आपल्या मनातील विचारांना(खयाल) कशा पद्धतीने मांडल्यावर वाचकाच्या काळजाचा वेध घेता येईल याची मिमांसा जो करु शकतो तोच वृत्तबद्ध लिखाणाचा आनंद घेऊ शकतो. अनेक समिक्षणे एवढ्यात वाचायला मिळालीत ज्यात नवोदित गजलकार/कवींवर खुलेआम टिका केल्याचे आढळते. संख्यात्मक वाढ वगैरे विधाने जेव्हा केली जातात तेव्हा हा विचारही केला जावा कि विचारांची परिपक्वता प्रत्येक पिढीत सारखीच नसणार/नसेल. त्यामुळे मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या परिपक्वतेवर बोट ठेवण्यापेक्षा कालानुरुप होणारे बदल स्विकारायला हवेत.

गोविंदरावांची ही गजल माझ्या बहुतेक मुद्द्यांना स्पष्ट करणारी आहे....

मोहातुन सगळ्या वाट काढली आहे
मी तुला दिलेली वेळ पाळली आहे

जो दिवस उजाडत आहे त्यावर बोलू
कालची रात्र केव्हाच संपली आहे

मी जवळपासही माझ्या फिरकत नाही
मी मला स्वतःची भिती घातली आहे

फिरताना हल्ली त्रास उन्हाला होतो
जिकडे तिकडे सावली सांडली आहे

हे आयुष्याचे कुचकामी गाठोडे
जगण्याची आशा फक्त कोंबली आहे

ह्या तलवारीचा घाव खोलवर होइल
ह्या तलवारीची मूठ चांगली आहे

झुकतील पापण्या आता सूर्याच्याही
मी आकाशावर झेप रोखली आहे

मी मंथनात कुठल्याही सामिल नाही
मी फक्त विषावर नजर ठेवली आहे

गोविंद....

प्रकृतीला हात घालण्याचे कसब त्यांना खुप छान रितीने जमले आहे. त्यांच्या लिखाणावर चिंतन केले तर नवोदितांना लिखाणात नक्कीच योग्य मार्ग मिळेल.

मला स्वतःला पारंपारिक वृत्तबद्ध कविता लिहायला आवडते कारण मला त्यातून आनंद मिळतो. वर्तमानावर भाष्य करताना शब्दांशी सख्य करणे मला जमत नसावे कदाचित. म्हणून मी आधुनिकतेवर भाष्य करणार्‍या नवोदित कवींना कमी लेखायला नकोय. प्रत्येकाचा वेगळा पिंड असतो ज्याला आपण प्रकृति म्हणू या. महत्व हवे आकृतीबंधाला. व्याकरणाचे शस्त्र हातात घेऊन वृत्तबद्ध लेखनाची सुंदर लेणी कोरणे हेच आपले मुळ उद्दिष्ट असावे असे मला वाटते.( हे विधान वृत्तबद्ध ज्यांना वृत्तबद्ध लिखाण करायचे आहे त्यांच्यासाठी आहे ) बाकी दिवसाला हजारो कविता आपल्या मराठी साहित्याला सोडल्या जातीत. कालप्रवाहात काय काय टिकते/टिकेल याचा अंदाज आपण आतापासून घेतला तर पुढील लिखाणात सोयीस्कर पावले उचलता येतील. जाता जाता गोविंदरावांचा शेर लिहावा वाटतोय....

चक्रव्यूहाची स्वताच्या कल्पना येते कुठे
मग स्वताला भेदण्यातच संपते आयुष्य हे

चक्रव्युहात सापडण्यापुर्वीच बाहेर बाहेर पडण्याचा मार्गही शोधून ठेवा......( क्रमश:) ( चु भू दे घे )

-- संतोष वाटपाडे

No comments:

Post a Comment