Thursday, September 1, 2016

माझा बाबा

माझा बाबा मांडीवरती वळता वळता दोरी
रटाळवाण्या एक दुपारी बसला होता दारी
समोर पसरवलेली होती जमीन काळी सारी
अंग जाळत्या उन्हात होती माती तळमळणारी....

खुरटे होते केस पांढरे त्याच्या दाढीवरती
दुरुन जाणवणारी थरथर होती मानेवरती
घाम निथळता अंगावरचा टोचत होता बहुधा
माशा भणभण करीत होत्या ओल्या डोक्यावरती...

मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही....

गुडघ्यावरती तळपायाला टिचरं भळभळणारी
तरीही डोळ्यामधे काळजी टपटप ओघळणारी
दिंडी गेली रित्या हाताने दारावरुन परतून
व्यथा मनाची हीच एकटी पुन्हा पुन्हा सलणारी.....

धोतर चिरले होते तेथुन चिंध्या लोंबत होत्या
उष्ण झळांच्या अधीर जळवा गाली झोंबत होत्या
बांधावरती नुसत्या फिरत्या गरीब काही शेळ्या
दारामधला बाबा पाहून उगाच थांबत होत्या....

परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता.....
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)

No comments:

Post a Comment